अंगणवाडी हलवली अन् ‘बार’ची सोय केली : कोंडिग्रेत शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:06 AM2018-05-30T00:06:00+5:302018-05-30T00:06:00+5:30

सर्वत्र दारूबंदीसाठी पावले उचलली जात आहेत. शिक्षणासाठी अनेक सोयी-सुविधा उभारून नव्या पिढीला ज्ञानदानाची दालने खुली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतानाच बीअर

Anganwadi moved and arranged for bar: Importance of alcohol more than condensed education | अंगणवाडी हलवली अन् ‘बार’ची सोय केली : कोंडिग्रेत शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व

अंगणवाडी हलवली अन् ‘बार’ची सोय केली : कोंडिग्रेत शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व

Next
ठळक मुद्देअंगणवाडी बालकांची होणार ससेहोलपट; बारमालकाने केले सर्वांना ‘थंड’

घन:शाम कुंभार।
यड्राव : सर्वत्र दारूबंदीसाठी पावले उचलली जात आहेत. शिक्षणासाठी अनेक सोयी-सुविधा उभारून नव्या पिढीला ज्ञानदानाची दालने खुली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असतानाच बीअर बारला अडचण ठरणारी अंगणवाडी हलविण्यात आली. हलविण्यात आलेली अंगणवाडी दीड किलोमीटर अंतरावर असल्याने बालकांची ससेहोलपट होणार आहे. कोंडिग्रेने शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व असल्याचे स्पष्ट केले.

कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथे पार्वती औद्योगिक वसाहतीनजीक अंगणवाडी क्र. २८१ ही १५ आॅगस्ट २००३ पासून सुरू आहे. यामुळे परिसरातील कामगार वस्ती व मळे भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले झाल्याने त्यांचा बालमनोविकास होत आहे. यामुळे या अंगणवाडीबाबत अद्याप कोणाचीही तक्रार नव्हती.

अंगणवाडीजवळच मोकळ्या शेडमध्ये बीअर बार सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याकरिता बारमालकांकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह इतरांच्यावर विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा अंगणवाडी परिसरात आहे. सध्या सर्वत्र सुटीचा हंगाम असल्याने बालकांसह पालक परगावी गेले आहेत. अंगणवाडीत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. याचा फायदा घेऊन सध्याच्या ठिकाणापासून अंदाजे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाजवळील उपलब्ध असलेल्या जागेत अंगणवाडी क्र. २८१ हलविण्यात आली आहे.

अंगणवाडीतील मुले लहान असल्याने त्यांना शारीरिक त्रास होऊ नये व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या भावनेतून शासन वस्तीपासून जवळच त्यांची शिक्षणाची सोय करते; परंतु बीअर बार सुरू होण्यासाठी याठिकाणची अंगणवाडी हलवून दीड किलोमीटर अंतरावर ती सुरू केल्याने बालकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. एवढा त्रास सहन करून पालक त्यांना पाठवतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आंदोलनाचा पवित्रा
बीअर बारसाठी अंगणवाडी हलवली असल्याने कोंडिग्रेने शिक्षणापेक्षा दारूला महत्त्व दिले आहे. हे सर्व करीत असताना बारमालकाने सर्वांना ‘थंड’ केले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासन दरबारी कोण लक्ष घालणार व सामाजिक संघटना का गप्प बसल्या? असा सवालही उपस्थित होत आहे. आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सुरू व्हावी व बीअर बार सुरू होऊ नये यासाठी काही मंडळी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.


सेविका सरस्वती भागाडे यांनी परस्पर अंगणवाडी क्र. २८१ हलविली आहे. त्यांच्यावर कारवाई करणार आहोतच. याबाबत कोंडिग्रेचे सरपंच पेटारे यांना विचारले असता, मी सरपंच आहे, कोठे अंगणवाडी भरवायची ते मी ठरवणार, असे सांगितल्याचे शिरोळच्या प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी छाया कोहाडे यांनी स्पष्ट केले.
 

हेरवाडे मळा, खिलारे मळा, सुलतानपुरे मळा येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीमध्ये अंगणवाडी क्र. २८१ भरविण्यात येत आहे. त्या भागातील मुलांना अंगणवाडीत घेऊन येण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाºयांची आहे.
- प्रदीप पेटारे,
कोंडिग्रे सरपंच

Web Title: Anganwadi moved and arranged for bar: Importance of alcohol more than condensed education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.