शास्त्रीनगरातील हॉस्पिटलमधून अडीच लाखांची रक्कम लंपास; सफाई कामगारांवर संशय
By उद्धव गोडसे | Updated: October 12, 2023 20:28 IST2023-10-12T20:28:27+5:302023-10-12T20:28:41+5:30
शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपजवळ असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलेल्या रुग्णाच्या नातेवाइकाची अडीच लाखांची रक्कम लंपास झाली.

शास्त्रीनगरातील हॉस्पिटलमधून अडीच लाखांची रक्कम लंपास; सफाई कामगारांवर संशय
कोल्हापूर: शास्त्रीनगर येथील केएमटी वर्कशॉपजवळ असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलेल्या रुग्णाच्या नातेवाइकाची अडीच लाखांची रक्कम लंपास झाली. हॉस्पिटलच्या स्वच्छतागृहात विसरलेली रक्कम सफाई कामगारांनी पळविल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला असून, राजारामपुरी पोलिसांकडून दोन संशयितांची चौकशी सुरू आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.१२) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडनेर्ली येथील एका तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने नातेवाइकांनी गुरुवारी सकाळी त्याला शास्त्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी रुग्णाचा भाऊ हॉस्पिटलमधील स्वच्छतागृहात गेला. त्याने त्याच्याकडील अडीच लाख रुपये रोकड असलेली कापडी पिशवी स्वच्छतागृहात अडकवून ठेवली. काही मिनिटांतच सफाई कामगारांनी साफसफाई करण्याचे कारण सांगून त्यांना लवकर बाहेर येण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदार घाईगडबडीत पैशांची पिशवी स्वच्छतागृहात विसरून बाहेर आले. पाच मिनिटांनी पैशांची पिशवी विसरल्याचे लक्षात येताच ते स्वच्छतागृहाकडे गेले. मात्र, तिथे असलेल्या सफाई कामगारांनी पिशवी विसरली नसल्याचे सांगत पळ काढला. हॉस्पिटलमधील प्रशासनाने पिशवी शोधण्यास सहकार्य केले नाही, त्यामुळे तक्रारदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.