संघर्षाच्या पायाभरणीतच रुतला ‘आंबेओहळ’
By Admin | Updated: July 23, 2015 00:27 IST2015-07-23T00:27:17+5:302015-07-23T00:27:17+5:30
प्रकल्प १८ वर्षे रखडला : केव्हा होणार पाणीसाठा ? जनतेचा प्रश्न; अनेक प्रश्न प्रलंबितच

संघर्षाच्या पायाभरणीतच रुतला ‘आंबेओहळ’
गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी आंबेओहळ प्रकल्पाचे गेले १८ वर्षे भिजत घोंगडे पडले आहे. मुळचा २९ कोटींचा प्रकल्पखर्च आता ११४ कोटींवर गेला असून, अद्याप २० टक्के काम बाकी आहे. त्यासाठी अंदाजे ५० कोटींच्या निधीची अपेक्षा आहे. पुर्नवसनाचा व भूसंपादनाचा तिढाही अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. किमान आता युती शासनाच्या काळात तरी रखडलेल्या या प्रकल्पाचे भाग्य उजळावे, अशी येथील जनतेला अपेक्षा आहे. त्यानिमित्त या प्रकल्पाचे वास्तव मांडणारी लेखमाला आजपासून...
रविंद्र येसादे ल्ल उत्तूर
आजरा तालुक्यातील आंबेओहळ ओढ्यावर पाटबंधारे प्रकल्प उभारण्यास १९९७ साली तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र या प्रकल्पाच्या जागा निश्चितीपासूनच संघर्षास सुरुवात झाली, ती आजअखेर कायम आहे.
आजरा-उत्तूर मार्गावर ‘चिमटा’ या ठिकाणी प्रकल्पाचे क्षेत्र प्रथम निश्चत करण्यात आले मात्र याला विरोध झाल्यानंतर आर्दाळ, करपेवाडी येथील आंबेओहळ ओढ्यावर प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाला व त्याला १६/१०/१९९८ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, प्रकल्पाचे काम सुरू होऊ नये म्हणून प्रचंड विरोध झाला. उत्तूर, करपेवाडी, व्होन्याळी, आर्दाळ येथील स्थानिकांनी स्थापन केलेल्या समित्या, धरणकृती समित्या यामुळे प्रकल्पास विरोध होऊ लागला. ११३ विस्थापितांना सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून ताब्यात घेऊन प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले.
तत्कालिन आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाने २९.३१ कोटी रकमेस १९९८ साली प्रशासकीय मान्यता दिली. आणी धरणाच्या कामास सुरुवात झाली. पहिली चार वर्षे प्रकल्पाचे काम व पुनर्वसन धुमधडाक्यात सुरू झाले. त्यानंतर मात्र कधी भूसंपादन तर कधी पुनर्वसन तर कधी निधीची चणचण यामुळे हा प्रकल्प रखडत गेला.
प्रकल्पग्रस्तांना द्यावी लागणारी जमीन
आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांना ६५ टक्के रक्कम भरून याच लाभक्षेत्रातील उत्तूर, आर्दाळ, वडकशिवाले, महागोंड, हालेवाडी, पेंढारवाडी, महागोंडवाडी या आजरा तालुक्यातील, तर शिपूर, कडगाव, लिंगनूर, करंबळी, अत्याळ, गिजवणे, बेकनाळ या गडहिंग्लज भागातील जमिनी मिळणार आहेत. तसेच चित्री लाभक्षेत्रातील जमिनीही द्यावी लागणार आहे.
सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे
प्रकल्पातील पाण्याचा वापर पूर्ण क्षमतेने व्हावा, यासाठी सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. उत्तूरपर्यंत चार बंधारे, शिप्पूर, करंबळी व गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे प्रत्येकी एक बंधारा बांधण्यात येणार आहे.
लाभ क्षेत्र : गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर क्षेत्र, तर आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पामुळे सिंचनखाली येणार आहे. उत्तूर, मुमेवाडी, चव्हाणवाडी (ता. आजरा) तर शिप्पूर, कडगाव, लिंगनूर, गिजवणे (ता. गडहिंग्लज), ही गावे लाभक्षेत्रात येतात.
दोन गावठाणे
प्रकल्पग्रस्तांना निवाऱ्यासाठी लिंगनूर व कडगाव (ता. गडहिंग्लज) येथे गावठाणे सर्व सोयिनियुक्त उभी करण्यात येणार आहेत.
०.५० मे. वॅट वीज निर्मिती
प्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर ०.५० मे. वॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे.
बुडीतक्षेत्र
उत्तूर, करपेवाडी व आर्दाळ गावांमध्ये धरण पाया, सांडवा व खाणक्षेत्रासाठी १२४ हेक्टर इतकी जागा जाते. आर्दाळ, हालेवाडी, होन्याळी, महागोंड व वडकशिवाले, आदी गावांतील सुमारे ३९५ हेक्टर क्षेत्र बुडीत आहे. कोणतेही गाव पूर्णपणे बुडीत क्षेत्रात जात नाही.