अंबाबाईचा आजपासून किरणोत्सव
By Admin | Updated: November 9, 2016 01:14 IST2016-11-09T01:16:20+5:302016-11-09T01:14:16+5:30
भौतिक अडथळ्यांबाबत उदासीनता

अंबाबाईचा आजपासून किरणोत्सव
कोल्हापूर : प्राचीन वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज, बुधवारपासून वर्षातील दुसऱ्या किरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. दरवर्षी श्री अंबाबाईचा किरणोत्सव जानेवारी ३०, ३१ ते १ फेब्रु्रवारी तसेच ९, १०, ११ नोव्हेंबर असा वर्षातून दोनदा होतो. महाद्वारातून थेट मंदिरात आलेली किरणे पहिल्या दिवशी महालक्ष्मी मूर्तीच्या चरणांपर्यंत, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी मुखावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी अर्थात किरणोत्सवाच्या शेवटच्या दिवशीही उंच इमारती, हवेतील प्रदूषण, वाढलेल्या झाडांच्या फांद्या, अशा अडथळ्यांमुळे किरणे देवीच्या कमरेपर्यंतच पोहोचली होती. त्यामुळे यंदा किरणोत्सव कुठपर्यंत पोहोचणार याची भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
भौतिक अडथळ्यांबाबत उदासीनता
श्री अंबाबाई मंदिरात आज, बुधवारपासून किरणोत्सव सोहळा होत आहे. गेली अनेक वर्षे किरणोत्सव सोहळ्यादरम्यान भौतिक अडथळे दूर करण्याबद्दल अभ्यासकांकडून सूचना केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात त्या सूचनांचे पालन होत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आजही किरणोत्सवातील अडथळा कायम आहे. किरणोत्सव मार्गात वाढलेल्या इमारती, अतिक्रमणे, फलक, पाण्याची टाकी, झाडे, पत्र्याचे शेड यांमुळे देवीच्या किरणोत्सवात अडथळा निर्माण होत असून, तो दूर करणे आवश्यक आहे. मात्र किरणोत्सव सोहळ्यादरम्यान या भौतिक अडथळ्यांचा विषय केवळ चर्चेलाच येतो. प्रत्यक्षात ते दूर करण्याकामी प्रशासनाची उदासीनताच दिसून येत आहे.
चरणांपर्यंत किरणे
श्री अंबाबाई मंदिरात आज, बुधवारपासून किरणोत्सव सोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासकांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी केली असता ही सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या चरणांपर्यंत पोहोचली व विरळ झाली. आता आज, बुधवारपासून किरणोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने त्याबाबत भाविक व अभ्यासक यांच्यामध्ये मोठी उत्सुकता आहे.