अमल महाडिक यांच्याकडे 'इतक्या' कोटीची मालमत्ता, साडेतीन पटीने झाली संपत्तीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 16:36 IST2021-11-23T16:35:57+5:302021-11-23T16:36:50+5:30
कोल्हापूर : भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार अमल महाडिक यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांत साडेतीन पट वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज ...

अमल महाडिक यांच्याकडे 'इतक्या' कोटीची मालमत्ता, साडेतीन पटीने झाली संपत्तीत वाढ
कोल्हापूर : भाजपचे विधानपरिषदेचे उमेदवार अमल महाडिक यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षांत साडेतीन पट वाढ झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या शपथपत्रामध्ये त्यांनी २१ कोटी ४४ लाख रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात त्यांचे २४ ठिकाणी भूखंड आणि शेतजमीन आहे.
विविध ठिकाणी केलेली गुंतवणूक, समभाग अशी ११ कोटी ६९ लाखांची महाडिक यांची जंगम मालमत्ता असून, एक कोटी ४८ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. महाडिक यांनी ७ कोटी ४३ लाखांची मालमत्ता स्वत: खरेदी केली असून, त्यांना वारसा हक्काने ८२ लाखांची मालमत्ता मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे. २०१४ साली त्यांची ही संपत्ती ६ कोटी ११ लाख होती. तिच्यात साडेतीन पट वाढ झाली आहे. त्यावेळी त्यांचे कर्ज १ कोटी ५६ लाख होते. ते २०२१ ला ४ कोटी ९३ लाख रुपये झाले आहे.
अमल आणि त्यांच्या पत्नी शौमिका यांच्याकडे ६६ तोळे सोने असून, त्याची किंमत ३४ लाख ९७ हजार रुपये होते. महाडिक यांनी २०१५-१६ मध्ये ३५ लाख ९५ हजार, २०१६-१७ मध्ये ४३ लाख २४ हजार, २०१७-१८ मध्ये ६१ लाख ५१ हजार, २०१८-१९ मध्ये ५७ लाख ८२ हजार आणि २०१९-२० मध्ये ५० लाख २० हजार रुपयांच्या उत्पन्नावर आयकर भरल्याचे शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
व्यवसाय आणि शेतीतून उत्पन्न
अमल महाडिक यांनी व्यवसाय आणि शेतीमधून आपल्याला हे उत्पन्न मिळाल्याचे नमूद केले आहे. पत्नी शौमिका यांचेही उत्पन्न शेती आणि व्यवसाय तसेच जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या मानधनातून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
२४ ठिकाणी शेतजमीन
महाडिक यांनी आपली २४ ठिकाणी शेतजमीन असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये पाच गुंठ्यांपासून ते १८ एकरांपर्यंतच्या जमिनीचे विवरण देण्यात आले आहे. पंढरपूर, करवीर, हातकणंगले, कागल, गगनबावडा, निपाणी तालुक्यामध्ये ही जमीन आहे.