अलमट्टी धरण उंचीविरोधात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:07 IST2020-08-29T18:06:49+5:302020-08-29T18:07:51+5:30
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास जर केंद्र शासनाने परवानगी दिली तर प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला आहे .

अलमट्टी धरण उंचीविरोधात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवर उतरू
कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे समजले. ही उंची वाढविण्यास जर केंद्र शासनाने परवानगी दिली तर कोरानाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्या वतीने रस्त्यांवर उतरू, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी दिला आहे .
अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्याचा निर्णय अद्याप नाही तोवर कर्नाटक सरकार आडमुठे धोरण घेऊन उंची वाढवण्यासाठी आग्रही आहे. मागील वेळी राज्यकर्त्याच्या चुकीच्या भुमिकेमुळेच धरणाची उंची वाढविली व त्याचा फटका महाप्रलंयकारी महापुराने वरील जिल्ह्यातील जनतेला बसला.
कर्नाटक शासनाने धरणाची उंची ५१० कायम ठेवावी. त्याच्यावर उंची वाढवू नये. लोकभावना एवढ्या तीव्र आहेत की अलमट्टी धरणाचे अस्तित्वच राहणार नाही, याची दखल केंद्र सरकारने घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गेल्या वर्षीच्या महाप्रलंयकारी महापुरामुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. सदर महापुरास ज्याप्रमाणे अतिवृष्टी हे एक कारण आहे, त्याप्रमाणेच कर्नाटक राज्यातील हिप्परगी व अलमट्टी ही धरणे हीसुद्धा महत्त्वाची कारणे आहेत. या धरणांतील अतिरिक्त पाणीसाठा तसेच पावसाच्या प्रमाणात धरणातून योग्य वेळी पाण्याचा विसर्ग झाला नाही; त्यामुळे त्याच्या बॅकवॉटरचा फटका कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्याला बसला होता.