Allotment of around Rs. 5 crore to the flood victims | पूरग्रस्तांना २१ कोटींचे अनुदान वाटप, पंचनाम्याचे ४० टक्के काम पूर्ण

पूरग्रस्तांना २१ कोटींचे अनुदान वाटप, पंचनाम्याचे ४० टक्के काम पूर्ण

ठळक मुद्दे जिल्ह्यात पंचनाम्याचे ४० टक्के काम पूर्ण शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत पंचनाम्यासाठी अडचणी, बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत

कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आतापर्यंत सुमारे २१ कोटी शासकीय सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या शेतीसह मालमत्तांचे आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.

यामध्ये शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत शेतांमध्ये पाणी असल्याने पंचनाम्यास अडचणी येत आहेत, तर शहरात रविवारी साडेसहा हजार मालमत्तांचे पंचनामे होऊन सानुग्रह अनुदान वाटपाला सुरुवात झाली, तसेच शहरातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठाही सुरळीत झाला.

महापुराच्या थैमानाने हजारो कुटुंबे रस्त्यावर आली. पूर ओसरला असून, आता या कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक पाठबळाची गरज आहे. शासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने पाच हजार रुपयांचे रोख सानुग्रह अनुदान जागेवर जाऊन वाटप केले जात आहे.

आतापर्यंत सुमारे २१ कोटी रुपये जिल्ह्यात वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. ते सर्व तालुक्यांत आवश्यक त्या प्रमाणात वाटण्यात आले. त्यानंतर पुन्हा १0 कोटींची मागणी करण्यात आली. त्यानुसार शिरोळ तालुक्यासाठी चार कोटी, हातकणंगले व करवीर तालुक्यांसाठी प्रत्येकी तीन कोटी रुपये असे १0 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्याचे लवकरच वाटप सुरू होणार आहे.

नुकसानग्रस्त शेती, घरे, गोठे, जनावरे यांचे पंचनामे सुरू झाले असून, ते आतापर्यंत जिल्ह्यात ४० टक्के इतके झाले आहेत. कोल्हापूर शहरातील सुमारे सहा हजार ५०० मालमत्तांचे पंचनामे झाले असून, पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटपाला सुरुवात झाली.

शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील पंचनाम्यासाठी अडचणी येत आहेत. अद्यापही शेतांमध्ये पाणी आहे; त्यामुळे या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत

महापुरामुळे विस्कळीत झालेला कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. रविवारी शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथील यंत्रणेत पुरामुळे झालेला बिघाड दुरुस्त करण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत झाला.
 

Web Title: Allotment of around Rs. 5 crore to the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.