आरोप-प्रत्यारोपांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:14+5:302021-01-13T05:00:14+5:30

संदीप बावचे शिरोळ : गावचा विकास, स्वच्छ व सुंदर ग्रामनिर्मिती, राष्ट्रीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणार, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ ...

Allegations and counter-allegations added color to the Gram Panchayat elections | आरोप-प्रत्यारोपांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली

आरोप-प्रत्यारोपांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली

संदीप बावचे

शिरोळ : गावचा विकास, स्वच्छ व सुंदर ग्रामनिर्मिती, राष्ट्रीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणार, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ कारभार करणार, शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना राबविणार, मजुरांना शासन स्तरावरील सोयी व योजनांचा लाभ देणार, अशा घोषणांचा पाऊस सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळत आहे. सर्वच उमेदवारांचा शक्तिप्रदर्शनासह होम टू होम प्रचार सुरू आहे. जाहिरनाम्याच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी चालविला आहे. मतदारांच्या दारात घोषणापत्रे पोहोचविली जात आहेत. बहुतांशी ग्रामपंचायतींनी प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील तेच ते मुद्दे दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत कुठे परिवर्तन तर कुठे ग्रामविकास आघाडी अशा नावाने पॅनेलची बांधणी करून गावपुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मैदानात उतरविले आहे. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे कारभारी येत्या १८ जानेवारीला ठरणार आहेत.

सतरा सदस्य असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती तालुक्याच्या नेत्यांनी केंद्रीत केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची सर्वतोपरी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

मतदारांना प्रभावित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मागील पाच वर्षांत कोणती कामे केली, शासनाच्या कोणत्या योजना राबविल्या, असे सांगितले जात आहे. तर विरोधी गटाकडून सत्ताधाऱ्यांना टार्गेट करून गेल्या पाच वर्षांत गावाच्या विकासापेक्षा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही गावचा संपूर्ण विकास करू, असे देखील आश्वासन विरोधी गटाकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. विजयापर्यंत पोहोचण्यासाठी एक गठ्ठा मतांचीदेखील जुळवाजुळव सुरू आहे.

दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतीमुळे उमेदवार, नेते विजयासाठी धडपड करीत आहेत. यात सत्ताधारी सत्ता टिकविण्यासाठी तर विरोधक परिवर्तन करण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. एकूणच उमेदवारांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडत असला तरी सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार की परिवर्तन होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

फोटो - १००१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबविली जात आहे.

Web Title: Allegations and counter-allegations added color to the Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.