कोल्हापूर : नागरिकांचा वेळ, त्रास वाचवण्यासाठी कोल्हापूर महापालिकेतही विशेष ॲपच्या माध्यमातून दाखले आणि परवाने देणार, २५ वर्षे टिकणारे सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते, नवे पार्किंग तळ, २०० ई-बस, केसरी कुस्ती स्पर्धा, संगीत महोत्सव, महापालिका नवी इमारत आणि ज्येष्ठ नागरिकांना केएमटीतून मोफत प्रवास अशा विविध घोषणा करणारा जाहीरनामा महायुतीच्या नेत्यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केला. केंद्रात आणि राज्यात महायुतीचीच सत्ता असल्याने जाहीरनाम्यातील सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव विजय बलुगडे, कृष्णराज महाडिक उपस्थित होते.महापालिकेची सध्याची इमारती अडचणीची असून नवी इमारत उभी करण्यात येईल.नागरिकांच्या सूचनांचा अर्थसंकल्पामध्ये समावेश असेल. नागरिकांना विश्वासात घेऊन तज्ज्ञांच्या सहभागातून महापालिकेची प्रचलित घरफाळा पद्धत बदलण्यात येईल. महापालिकेच्या मालमत्ता भाड्याने घेण्यास व्यावसायिक का तयार होत नाहीत, याचाही अभ्यास केला जाईल.
वाचा : कामात टक्केवारी खाणार नाही, आपच्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्रमहापालिकेच्या शाळांची स्थिती सुधारण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती नेमून सूचना घेतल्या जातील. जगर नगरमधील शाळेच्या धर्तीवर अन्य शाळांचे शैक्षणिक व्यवस्थापन केले जाईल. ज्या भागात शाळा पूर्णतः बंद आहेत तेथील शाळा इमारतींचा वापर नागरिकांच्या अन्य सुविधांसाठी केला जाईल. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी शहरातील अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सुधारली जाईल, मलनि:सारण प्रकल्पाची उभारणी करून सर्व सांडपाणी प्रक्रिया करूनच सोडले जाईल. पंचगंगा घाट सुशोभित करण्यात येईल. रंकाळ्यात सांडपाणी जाणार नाही, याची चोख व्यवस्था करतानाच धुण्याच्या चाव्या नियमितपणे वापरात राहतील, अशी व्यवस्था केली जाईल.
२०० ई-बसचा ताफाकोल्हापुरात पुढील पाच वर्षांत किमान २०० इलेक्ट्रिक बसचा ताफा कार्यान्वित केला जाईल. यासाठी आवश्यक त्या बस, चार्जिंग स्टेशन याची व्यवस्था केली जाईल. या बससाठी तिकीट, दिवसाचा किंवा मासिक पास ऑनलाइन दिला जाईल. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू करणार.
कचरा उठावकचरा उठावामध्ये अधिक नियमितपणा तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि व्यवस्थापन यंत्रणेद्वारे आणला जाईल. आमूलाग्र बदल. वाढती उपनगरे, अपार्टमेंट, गृह प्रकल्पासाठी तज्ज्ञ, अनुभवी पर्यावरणवादी यांचे मार्गदर्शन आणि सामाजिक संस्थांचा सहभाग घेतला जाईल.रस्ते बांधणी...कोल्हापूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते पुढील २५ वर्षे टिकतील असे सिमेंट कॉन्क्रिटचे करून शहरात येणाऱ्या सर्व प्रवेशमार्गाचे रुंदीकरण करून आवश्यक तेथे फ्लाय ओव्हरची उभारणी केली जाईल. तसेच, कोल्हापूरच्या प्रवेशद्वारांचे संस्कृतीशी सुसंगत सुशोभीकरण केले जाईल.
महायुती हे करणार- महिलांसाठी १० स्वच्छतागृहे.- शहराच्या उपनगरात आजही जी क्रीडांगणे आहेत (शिवाजी स्टेडियम, शाहू स्टेडियम) यांचे नूतनीकरण तसेच असलेल्या जलतरण तलावांचे-संवर्धन व नियोजन करून खेळाडूंना योग्य सुविधा देणे.- महिला, मुलींच्या सुरक्षिततेसाठी शहर आणि उपनगरांमध्ये सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण, युवा पीढी अमली पदार्थांपासून दूर राहावी, यासाठी भरारी पथकांची नियुक्ती.- महापालिकेच्या काही आरक्षित जागांवर सशुल्क पार्किंग तळ उभारले जातील.- ऑक्सिजन पार्क व विरंगुळा केंद्र उभारणी.- झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड.- उद्योग भूमीला साहाय्य आणि आयटी हबसाठी प्रयत्न.- लोकसहभागातून बागांचे सुशोभीकरण.- शहर, उपनगरांमध्ये सौर दिवे.- फेरीवाल्यांशी चर्चा करून झोन निश्चिती. खाऊ गल्ल्यांमध्ये शिस्त.- प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत संपूर्ण शहरात गॅस पाइपलाइनची पूर्तता.- विविध प्रकारच्या कलाकारांना प्रोत्साहन.- शहरात ६० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून मोफत व अल्प दरात उपचार.- सीपीआरमध्ये आधुनिक उपचार.- करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (३५० वे) जयंती वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने दरवर्षी एका कर्तृत्ववान महिलेस 'भद्रकाली ताराराणी पुरस्काराने' सन्मानित करणार.- केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण पूर्ण करण्यासोबतच कोल्हापूरात अत्याधुनिक कन्व्हेंशन सेंटरची उभारणी.
जे मनात.. तेच मनपातमहायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शाहीर डफावर थाप मारून पोवाडा सादर करत असल्याचे चित्र मुखपृष्ठावर छापण्यात आले आहे. ‘जे मनात, तेच मनपात’ अशी टॅगलाईन महायुतीने वापरली आहे. लॅपटॉप, फुटबॉल, संक्रातीचा तिळगूळ याचा उल्लेख करत कोल्हापुरी वैशिष्ट्यांची झलक या जाहीरनाम्यात दिसून येत आहे.
Web Summary : Mahayuti's manifesto promises Kolhapur citizens a unified app for services, durable roads, e-buses, parking, cultural events, and senior citizen KMT benefits. Focus on infrastructure, waste management, and citizen inclusion.
Web Summary : महायुति के घोषणापत्र में कोल्हापुर के नागरिकों के लिए एकीकृत ऐप, टिकाऊ सड़कें, ई-बसें, पार्किंग, सांस्कृतिक कार्यक्रम और वरिष्ठ नागरिकों के लिए केएमटी लाभ का वादा किया गया है। बुनियादी ढांचे, अपशिष्ट प्रबंधन और नागरिक समावेश पर ध्यान केंद्रित किया गया है।