शेतजमिनीची सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन, १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशन पूर्ण
By भीमगोंड देसाई | Updated: March 6, 2025 17:15 IST2025-03-06T17:15:21+5:302025-03-06T17:15:55+5:30
भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल, नगर भूमी अभिलेखकडील सर्व १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले ...

शेतजमिनीची सर्व कागदपत्रे आता ऑनलाईन, १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशन पूर्ण
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल, नगर भूमी अभिलेखकडील सर्व १ कोटी ३९ लाख अभिलेखांचे डिजिटलायझेशनचे काम पूर्ण झाले आहे. ही सर्व कागदपत्रे संबंधितांना https://bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेता येणार आहे. सध्या प्रमाणिकरणासाठी कार्यालयात जावे लागत आहे; मात्र कार्यालयातही जावे लागू नये, म्हणून नगर भूमी अभिलेखकडील सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही झाल्यानंतर तहसीलमधील रेकॉर्ड रूम आणि नगर भूमी अभिलेख कार्यालयातील नक्कल देण्यासाठीची दुकानदारी बंद होणार आहे.
महसूलकडील आणि नगर भूमी अभिलेखकडील कागदपत्रे कार्यालयात जाऊन मिळवताना हेलपाटे मारावे लागतात. मागतील तितके पैसे द्यावे लागतात. प्रत्येक तहसीलमधील रेकॉर्ड रूम आणि भूमी अभिलेख कार्यालयात मनमानी पैसे घेऊन नक्कल देणाऱ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. यातून सुटका करून घेण्यासाठी या शासनाच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हवी ती कागदपत्रे डाऊनलोड करून त्यावर सही हवी असल्यास ती घेण्यासाठी कार्यालयात जावे लागत आहे. सर्व कागदपत्रांवर डिजिटल सही झाल्यानंतर कार्यालयातही जाण्याची आवश्यकता नाही. शासनाचे ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर ते घरबसल्याही मिळवता येणार आहे. यामध्ये पारदर्शकता येणार आहे.
महसूलकडील डिजिटलायझेशन झालेल्या कागदपत्रांची संख्या आणि कंसात नगर भूमी अभिलेखकडील कागदपत्रांची संख्या अशी : कोल्हापूर शहर (१ लाख ९५ हजार), इचलकरंजी शहर (१ लाख ७ हजार), शाहूवाडी ११ लाख ११ हजार (१ लाख ७८ हजार), पन्हाळा १४ लाख (१ लाख ६६ हजार), हातकणंगले १८ लाख (१ लाख ४१ हजार), शिरोळ १० लाख (२ लाख ७३ हजार), गगनबावडा २ लाख (३७ हजार २१६ ), राधानगरी १२ लाख (२ लाख ४ हजार), कागल १४ (२ लाख), भुदरगड १२ लाख (१ लाख ७१ हजार ), आजरा ९ लाख (१ लाख ३० हजार), गडहिंग्लज १५ लाख ( २ लाख १० हजार).
ही कागदपत्रे डाऊनलोड करा
टिप्पन बुक, गुणाकार बुक, आकारफोड पत्रक, आकार प्रपत्र, कमी जास्त पत्रक, आकार बंध, नऊ तीन नऊ चार, शेत पुस्तक, दुरूस्ती अभिलेख, एकत्रीकरण, जबाबधारिका, शेतपुस्तक, ताबा पावत्या, चौरस नोंद वही, मिळकत पत्रिका, वसलेवार पुस्तक, जुने सातबारा, आठ अ, फेरफार, नकाशा, चालू सातबारा आठ अ, सिटी सर्व्हेतील मालमत्ता पत्रक यासह शेत, घरासंंबंधीची सर्व कागदपत्रे.
नगर भूमी अभिलेखकडील सर्व कागदपत्रांचे डिजिटल सहीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर नगरभूमापनकडील सर्व कागदपत्रे डिजिटल सहीचे ऑनलाईन मिळवता येतील. - शिवाजी भोसले, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर.