उन्हाच्या तडाख्याने आजरेकरांचे जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:19+5:302021-04-05T04:21:19+5:30
गेले आठ दिवसांपासूनचा कडक उन्हाळा आजरेकरांना त्रासदायक ठरू लागला आहे. दिवसा आग ओकणाऱ्या सूर्याने घामाघूम तर मध्यरात्रीनंतर सुटणारा गार ...

उन्हाच्या तडाख्याने आजरेकरांचे जनजीवन विस्कळीत
गेले आठ दिवसांपासूनचा कडक उन्हाळा आजरेकरांना त्रासदायक ठरू लागला आहे. दिवसा आग ओकणाऱ्या सूर्याने घामाघूम तर मध्यरात्रीनंतर सुटणारा गार वारा यामुळे नागरिकांच्या आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रत्येक वर्षी होळीच्या दरम्यान वळवाचा पाऊस होता. त्यामुळे उष्णतेची तीव्रता कमी असते; पण चालू वर्षी वळवाच्या पावसाने अद्यापही हुलकावणी दिली आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांमुळे नागरिक होरपळून जात आहेत. दुपारच्या वेळेत बाजारपेठेसह रस्ते ओस पडत आहेत. वातावरणातील बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. थंडी, तापाचे रुग्ण दवाखान्यातून वाढत आहेत. उन्हाच्या झळांनी दमछाक होऊन शरीराला आलेला थकवा घालविण्यासाठी शीतपेयांच्या दुकानांतून गर्दी होत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे कलिंगडे, गाजर, बीट, काकडी यांचे दर वाढले आहेत.
दिवसभराच्या उष्म्यानंतर वातावरणात बदल होऊन रात्री ११ नंतर हवेत गारवा पसरतो. दिवसा व रात्रीच्या तापमानात मोठा फरक पडत असल्याने त्याचा थेट आरोग्यावर परिणाम होत आहे. वयस्कर व्यक्तींना या बदलत्या वातावरणाचा जास्त त्रास होत आहे. प्रचंड उन्हामुळे आजऱ्याच्या बाजारपेठेत दुपारी १२ ते ५ यावेळेत शुकशुकाट असतो.