Kolhapur: अहमदनगरच्या भाविकाचा अंबाबाई मंदिरात मृत्यू, दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका
By उद्धव गोडसे | Updated: March 29, 2023 16:03 IST2023-03-29T15:57:22+5:302023-03-29T16:03:58+5:30
मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीवर गेले होते. दक्षिण भारत फिरून ते आज, सकाळी कोल्हापुरात पोहोचले

Kolhapur: अहमदनगरच्या भाविकाचा अंबाबाई मंदिरात मृत्यू, दर्शन रांगेतच आला हृदयविकाराचा झटका
कोल्हापूर : दक्षिण भारताची सहल करून परतणाऱ्या अहमदनगर येथील भाविकाला आज, बुधवारी (दि. २९) सकाळी अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामनाथ गबाजी जाधव (वय ६२, रा. मोर्विस, पो. चास नळी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे मृताचे नाव आहे.
रामनाथ जाधव हे अन्य चार मित्रांसह पंधरा दिवसांपूर्वी दक्षिण भारताच्या सहलीवर निघाले होते. दक्षिण भारत फिरून ते बुधवारी सकाळी कोल्हापुरात पोहोचले. अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेत गेल्यानंतर काही वेळाने अचानक त्यांच्या छातीत तीव्र कळ आली. रांगेतच कोसळल्याने त्यांना देवस्थान समितीच्या कर्मचा-यांसह मित्रांनी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
जाधव हे शेतकरी होते. दक्षिण भारताच्या सहलीत ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार असल्याची माहिती त्यांच्या सोबत आलेल्या मित्रांनी दिली. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.