Kolhapur: पद्मावतनंतर मसाई पठारावर लवकरच आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:47 IST2025-03-24T15:45:20+5:302025-03-24T15:47:13+5:30
निर्मात्यांसाठी हे पठार कमी खर्चात मोठे नाव मिळवून देते

Kolhapur: पद्मावतनंतर मसाई पठारावर लवकरच आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण
नितीन भगवान
पन्हाळा : पन्हाळगडाजवळील मसाई पठारावर येत्या एप्रिल अखेरपासून सलग एक महिना एक मोठ्या चित्रपट निर्मात्याच्या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या निरनिराळ्या परवानग्या घेतल्या जात आहेत. येथे उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक वाडे, घरे, मंदिरांच्या रचनेसाठी डिझायनरनी स्थळ पाहणी करून आराखडे तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
चित्रपटात काम करण्यासाठी आघाडीचे दोन मोठे कलाकार येणार असून, त्यांचा मुक्काम पन्हाळगडावर असणार आहे. या सर्व चित्रपट निर्मितीची गुप्तता पाळली जात असून, चित्रीकरण करताना मसाई पठारावर त्या काळात प्रवेशबंदी घातली जाण्याची शक्यता आहे. संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी येथे जाळपोळ झाली होती. तसा काही प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारे मसाई पठारावर मराठी - हिंदी चित्रपट , वेगवेगळ्या मालिका, वेबसिरीज, लघुपट, विविध जाहिरातींसाठी निर्मात्यांची पावले या ठिकाणी नेहमीच वळतात. चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी बाजू तसेच पठाराच्या सुरुवातीलाच व सभोवताली असणारे जंगल, विस्तीर्ण पठार, लेणी परिसर, छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेली चहाची बाग, यामुळे जिल्ह्यातील चित्रीकरण स्थळ म्हणून मसाई पठार चर्चेत आहे. निर्मात्यांसाठी हे पठार कमी खर्चात मोठे नाव मिळवून देते.
कोल्हापुरात चित्रीकरणासाठी येणाऱ्या निर्मात्यांना माझ्या संस्थेमार्फत सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. सर्वच प्रकारच्या चित्रीकरणासाठी मसाई पठार हे ठिकाण अगदी उत्तम ठिकाण आहे. शासनाने पायभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थनिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. - मिलिंद आष्टेकर, उपाध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद, माजी उपाध्यक्ष चित्रपट महामंडळ