बिबट्या, गव्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्ह्याचा उच्छाद; हल्ला करून चावा घेतल्याने दिंडनेर्लीत चौघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:14 IST2025-11-17T12:13:57+5:302025-11-17T12:14:58+5:30
गावात भीतीचे वातावरण, जखमींवर सीपीआरमध्ये उपचार

संग्रहित छाया
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली येथे कोल्ह्याच्या चाव्यात चौघे जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. १६) पहाटे तीन ते सकाळी आठच्या दरम्यान गावात आणि शेतात घडली. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, दिंडनेर्ली येथे रविवारी पहाटेपासून एका कोल्ह्याने उच्छाद मांडला आहे. पहाटे शेतात कामासाठी गेलेले आणि मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या चौघांवर हल्ला करून त्याने चावा घेतला.
यात विक्रम दिनकर पाटील (वय ६०), आकाश चंदर शिंदे (३२), पांडुरंग बंडू बोटे (७०) आणि बेबीताई यशवंत शिंदे (५०, सर्व रा. दिंडनेर्ली) जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या कोल्ह्याची शोध मोहीम स्थानिकांकडून सुरू आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.