Kolhapur Kalamba Jail: गांजा, मोबाइलनंतर आता पिस्तुलांचे आव्हान; गुन्हेगारांच्या टोळ्या आतही सक्रीय
By उद्धव गोडसे | Updated: November 6, 2025 17:55 IST2025-11-06T17:54:40+5:302025-11-06T17:55:44+5:30
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Kolhapur Kalamba Jail: गांजा, मोबाइलनंतर आता पिस्तुलांचे आव्हान; गुन्हेगारांच्या टोळ्या आतही सक्रीय
उद्धव गोडसे
कोल्हापूर : कळंबा कारागृहात सातत्याने गांजा आणि मोबाइल सापडत असल्याने आतील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आलीच होती. आता कारागृहातील शौचालयात पिस्तुलाचे जिवंत काडतूस सापडल्याने कारागृह प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्या आतही सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना रोखण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. अन्यथा लवकरच कारागृहात टोळीयुद्ध भडकण्याचे संकेत काडतुसाच्या घटनेतून मिळत आहेत.
राज्यातील प्रमुख कारागृहांपैकी एक असलेले कळंबा कारागृह अलीकडे गैरप्रकारांमुळे चर्चेत आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात अधिकाऱ्यांच्या विशेष शोधमोहिमेत या कारागृहात ८० मोबाइल आणि काही सीमकार्ड सापडले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ४६ मोबाइल सापडले. चार-दोन मोबाइल सापडण्याचे प्रकार नेहमीच सुरू असतात. यावरून कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा वापर होत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे मोबाइल शोधून काढणाऱ्या कारागृह प्रशासनाला मोबाइलचा वापर करणारा एकही कैदी सापडला नाही. सीमडकार्डवरून फोन करणाऱ्या व्यक्तींचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पुढे तपासाचे काय झाले हे कारागृहातील अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहिती आहे.
कारागृहातील कैद्यांकडून गांजाचा वापर सर्रास सुरू असतो. यात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. कैद्यांना गांजा पुरवणारा सुुभेदार बाळासाहेब गेंड याला अटक झाली होती. त्याच्या घरझडतीत सव्वादोन किलो गांजा सापडला होता. गांजा आणि मोबाइल पुरवण्याचे गैरप्रकार उघडकीस आल्याने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, तर ११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. तरीही, कळंबा कारागृहाचा कारभार सुधारलेला दिसत नाही.
जेलचा कारभार कैद्यांच्या हाती
कळंबा कारागृहात पुण्यातील गजा मारणे, आंदेकर यासह अनेक कुख्यात गुंडांच्या टोळ्यांमधील गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. मोक्का, अमली पदार्थांची तस्करी, खून, अपहरण, खंडणी वसुली अशा गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांची आत प्रचंड दहशत आहे. आतही कैद्यांच्या टोळ्या तयार झाल्या असून, त्यांच्याकडून इतर कैद्यांची पिळवणूक होते. गेल्या वर्षभरात झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन कैद्यांचा मृत्यू झाला. एके रात्री अंधारात कैद्यांच्या दोन गटात उडालेल्या धुमश्चक्रीत तुफान दगडफेक झाली होती. त्यात एक कैदी गंभीर जखमी झाला होता.
गंभीर घटनांचे संकेत
कारागृहात जिवंत काडतूस सापडले याचा अर्थ पिस्तूल आधीच पोहोचले असेल किंवा यायचे असेल. हा प्रकार वेळीच लक्षात आला नसता, तर कदाचित येणाऱ्या काही दिवसांत कारागृहात एखाद्या कैद्याचा खून झाला असता. पिस्तूल नाही मिळाले, तरी कैद्यांकडून काहीतरी अघटित घडू शकते, याचे संकेत या घटनेतून मिळाले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
कळंबा कारागृहात मोबाइल आणि गांजानंतर आता जिवंत काडतूस सापडणे गंभीर आहे. अशा वस्तू आत जातातच कशा याचे आश्चर्य वाटते. काडतुसामुळे पिस्तुल आत आसल्याची शंका येणे स्वाभाविक आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. - संजीव झाडे - पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे