कोविड सेंटर असल्याने शिवाजी विद्यापीठातील प्रवेश प्रतिबंधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 11:09 IST2021-04-15T04:24:51+5:302021-04-15T11:09:14+5:30
CoronaVirus Shivaji University Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहे कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत विद्यापीठ परिसर तात्पुरत्या स्वरूपात प्रतिबंधित करण्यात आला आहे. सर्व अभ्यागतांसाठी विद्यापीठ परिसरामध्ये प्रवेश प्रतिबंधित केला आहे.

कोविड सेंटर असल्याने शिवाजी विद्यापीठातील प्रवेश प्रतिबंधित
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या वतीने शिवाजी विद्यापीठातील वसतिगृहे कोविड केअर सेंटरसाठी अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत विद्यापीठ परिसर तात्पुरत्या स्वरूपात प्रतिबंधित करण्यात आला आहे. सर्व अभ्यागतांसाठी विद्यापीठ परिसरामध्ये प्रवेश प्रतिबंधित केला आहे.
विद्यापीठाचे प्रवेशद्वार क्रमांक एक आणि सहा केवळ विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, सेवक आणि विद्यापीठ निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या शिक्षक, अधिकारी, सेवकांच्या कुटुंबीयांसाठी खुली राहतील. प्रवेशद्वार क्रमांक आठ हे वसतिगृहांमधील कोविड सेंटरच्या रुग्ण आणि अनुषंगिक शासकीय वाहनांसाठी खुले राहणार आहे. संलग्नित महाविद्यालयांतील अतिमहत्त्वाच्या, परीक्षेच्या कामकाजासाठी संबंधित शिक्षक, अधिकारी, सेवकांना विभागप्रमुखांच्या पूर्वपरवानगीने प्रवेशद्वार क्रमांक एक आणि सहा येथून प्रवेश दिला जाईल.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठ अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन, अध्ययन सुरू ठेवावे. परीक्षा विभाग, अत्यावश्यक सेवेतील विभाग वगळता इतर सर्व विभागांतील अधिकारी, प्रशासकीय सेवकांनी रोटेशननुसार ५० टक्के उपस्थिती ठेवावी. शक्य असल्यास ऑनलाइन स्वरूपात काम करावे, असे आदेश विद्यापीठ प्रशासनाने निर्गमित केले असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली.