कोल्हापुरात साडेसात हजार इमारतींत वाढीव बांधकाम, महापालिकेतर्फे घरोघरी सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:52 IST2025-01-02T16:52:24+5:302025-01-02T16:52:39+5:30
२३ हजार ३६० मिळकतींचे सर्वेक्षण पूर्ण

कोल्हापुरात साडेसात हजार इमारतींत वाढीव बांधकाम, महापालिकेतर्फे घरोघरी सर्वेक्षण
कोल्हापूर : शहरातील नागरिकांनी केलेल्या वाढीव बांधकामामुळे महापालिका देत असलेल्या नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे, शिवाय ही बांधकामे रेकॉर्डवर न आल्यामुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. म्हणून महापालिका घरफाळा विभागाने अशा वाढीव बांधकामाचा शोध घेऊन त्यावर योग्य असा घरफाळा आकारण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या तेरा महिन्यात २३ हजार ३६० मिळकतींचे फेरसर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये जवळपास साडेसात हजार इमारतींमधून वाढीव बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे.
महानगरपालिका क्षेत्रात सदासर्वकाळ बांधकामे सुरू असतात. नवीन बांधकामांबरोबरच जुन्या इमारतींचे नूतनीकरण किंवा त्या पाडून त्याठिकाणी नवीन इमारती बांधण्याची कामेही सुरूच आहेत. नवीन इमारत पूर्ण झाली की, घरफाळा आकारणीनंतरच त्यांना बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे अशा इमारतींची नोंदणी महापालिका घरफाळा विभागाकडे होते. परंतु, जुन्या इमारतीतील वाढीव बांधकामांची नोंद मात्र घरमालक करत नाहीत.
शहराच्या अनेक भागात मूळ इमारतीचे बांधकाम क्षेत्र वाढविण्यात येत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. सुरुवातीला तळघर बांधले जाते. नंतर आर्थिक परिस्थिती सुधारली की, त्यावर पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात येते किंवा जागा असेल तर दुकानगाळ्यांचे बांधकाम केले जाते. त्याठिकाणी कुळे ठेवली जातात. परंतु, या वाढीव बांधकामामुळे त्या घरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होते. त्याचा नागरी सुविधांवर बोजा पडतो. पाण्याचा वापर वाढतो, सांडपाण्याचे, मलनि:स्सारणाचे प्रमाण वाढते. सध्या शहरात ड्रेनेज लाइन चोकअप होऊन सांडपाणी रस्त्यावर वाहते. हा वाढत्या नागरीकरणाचा परिणाम आहे.
जेव्हा ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली तेव्हा बांधकामाच्या वाढीव क्षेत्राचे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी खासगी ठेकेदारास हे काम देण्यात आले. परंतु, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांवरच पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्या ठेकेदारास महापालिकेने ब्लॅकलिस्ट केले आणि काम थांबविले. त्यानंतर चारपाच वर्षे अशीच निघून गेली. त्यानंतर पालिकेने स्वत:च्या कर्मचाऱ्यांमार्फत फेर सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे काम नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाले आहे.
या सर्वेक्षणासाठी घरफाळा विभागाने ६० पथके केली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचारी याप्रमाणे १२० कर्मचारी यावर काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांनी गेल्या तेरा महिन्यात शहरातील २३ हजार ३६० मिळकतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये जवळपास साडेसात हजार इमारतींमधून वाढीव बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. महापालिकेचे कर्मचारी घरी येऊन मोजणी टेपने प्रत्येक खोलीची लांबी रुंदी घेऊन त्यानुसारच बांधकाम सर्वेक्षण करत आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घराचे किती चौरस फूट बांधकाम आहे. त्यावर आकारलेला घरफाळा योग्य आहे का, याचीही छाननी होणार आहे.
मिळकत मालकांना नोटीस, सुनावणी घेणार
शहरातील ज्या मूळ इमारतींमधून वाढीव बांधकाम झाले आहे, अशा मिळकतधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. पहिल्या नोटीसमध्ये कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, त्यास कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. आता दुसऱ्या नोटीसद्वारे सुनावणीला बोलविण्यात आले आहे. त्यासही गैरहजर राहिल्यास काहीही म्हणणे मांडायचे नाही, असे समजून महापालिका त्या इमारतीवर नव्याने एकतर्फी घरफाळा आकारणी करणार आहे.
- शहरात मिळकतींची संख्या - १ लाख ६८ हजार
- व्यावसायिक मिळकतींची संख्या - २५ हजार ३००
- फेरसर्वेक्षण झालेल्या इमारती - २३ हजार ३६०
- वाढीव बांधकाम परंतु नोंदणी नाही अशा इमारती - ७,५००