गडहिंग्लज : स्मार्ट व प्रीपेड मीटर बसविण्याची कार्यवाही तातडीने थांबवावी व कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी सौरऊर्जेची सक्ती मागे घ्यावी, या मागणीसाठी गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांतील वीजग्राहकांनी महावितरण कंपनीच्या येथील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अहमदाबादच्या अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीने पुढील आदेशापर्यंत काम स्थगित करावेत, अशी लेखी सूचना कंपनीच्या प्रतिनिधींना देण्यात आली.
येथील लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गावर फिरून मोर्चा कडगाव रोडवरील ‘महावितरण’च्या विभागीय कार्यालयावर आला. शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांच्याशी चर्चा केली. यावेळी ‘अदानी’चे प्रशांत उगळे उपस्थित होते. दरम्यान, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा झाली. लेखी आश्वासनानंतर मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
चर्चेत कॉ. संपत देसाई, राजेंद्र गड्यान्नावर, नागेश चौगुले, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, डॉ. नंदिनी बाभूळकर, प्रा. स्वाती कोरी, बाळेश नाईक, कॉ. धोंडीबा कुंभार, संभाजी पाटील, प्रकाश मोरूसकर, संग्राम सावंत, रमजान अत्तार आदींनी भाग घेतला. मोर्चात किसनराव कुराडे, नितीन देसाई, कॉ. शिवाजी गुरव, मुकुंदराव देसाई, आनंदराव कुंभार, जोतिबा चाळके, मारुती कुंभार, आदींसह विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
मोर्चेकऱ्यांच्या मागण्या अशा
- गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड या डोंगरी, दुर्गम व अतिपावसाच्या प्रदेशातील कृषिपंपाच्या वीजजोडणीची सौरऊर्जा सक्ती मागे घेण्यात यावी.
- महावितरण व अदानी एनर्जी यांच्यात झालेल्या कराराची मराठी भाषेतील प्रत सर्व गावांतील गावचावडीवर लावण्यात यावी.
- ऑक्टोबरपूर्वी अर्ज केलेल्या कृषिपंपांना तातडीने वीजजोडणी द्यावी.
- ट्रान्सफाॅर्मरच्या लोखंडी खराब पेट्या तातडीने बदलाव्यात.
‘अदानी तुपाशी..जनता उपाशी...’!सोलर शक्ती रद्द करा, र्स्माट प्रीपेड मीटर रद्द करा, ‘अदानी तुपाशी..जनता उपाशी’, अदानी आला घराला..कात्री आपल्या खिशाला’, ‘अदानी चले जाओ’, महावितरणचे खाजगीकरण नको, ‘लाईट आमच्या हक्काचं..नाही कुणाच्या बापाचं’ आदी घोषणांनी गडहिंग्लज शहर दणाणून गेले.
ठिणगी पडली..वणवा पेटणार..!गडहिंग्लज विभागात स्मार्ट मीटरला मिळालेली स्थगिती हा जनशक्तीचा विजय आहे. यासंदर्भातील पहिली जनसुनवाई गडहिंग्लजमध्येच होईल. गडहिंग्लजमधील आंदोलनातून ‘अदानी’विरोधातील ठिणगी पडली आहे. त्याचा वणवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही कॉ. संपत देसाई यांनी यावेळी दिला.