Kolhapur: एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधातच अब्रूनुकसानीचा निकाल, साडेसात लाख रुपये भरपाईचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:22 IST2025-03-27T15:22:26+5:302025-03-27T15:22:47+5:30
कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर दाखल केलेल्या विनयभंगाच्या ...

Kolhapur: एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधातच अब्रूनुकसानीचा निकाल, साडेसात लाख रुपये भरपाईचा आदेश
कोल्हापूर : ज्येष्ठ अभिनेत्री छाया सांगावकर यांनी अखिल भारतीय मराठी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे अष्टेकर यांची बदनामी झाली. या विरोधात त्यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात दिवाणी न्यायालयात न्यायाधीश एस. बी. देवरे यांनी त्यांच्या बाजूने निकाल देत साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे. अशा प्रकरणात महिलेच्या विरोधात नुकसान भरपाईचा आदेश होण्याची ही कोल्हापुरातील पहिली घटना आहे.
याबाबत ॲड. प्रकाश मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, चित्रपट महामंडळाच्या संचालकांमधील अंतर्गत वादामुळे एकमेकांविरुद्ध तक्रारी करण्याचे प्रकार सात वर्षांपूर्वी झाले होते. यातून सांगावकर यांनी अष्टेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात अष्टेकर यांची फौजदारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
त्यानंतर अष्टेकर यांनी या प्रकरणात आपली बदनामी झाल्याने २५ लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्याविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा न्यायालयाने अंशत: मंजूर करून सांगावकर यांना साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला आहे. अष्टेकर यांच्यावतीने ॲड. प्रकाश माेरे, ॲड. अतुल जाधव, ॲड. शैलजा चव्हाण यांनी काम पाहिले.