अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 19:11 IST2019-06-03T19:09:36+5:302019-06-03T19:11:30+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कारवाईचा बडगा उगारला ...

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सोमवारी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या हद्दीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष महेश जाधव, विजय पोवार, संगीता खाडे उपस्थित होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कारवाईचा बडगा उगारला आहे. समितीच्या वतीने मंदिराच्या हद्दीची मोजणी करण्यात आली असून, जवळपास सहा हजार चौरस फूट जागेवर अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या मिळकतधारकांना नोटिसा काढण्यात येणार असून, १५ दिवसांत त्यांनी अतिक्रमण न हटविल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने ११ फेब्रुवारीला मंदिराच्या हद्दीची शासकीय मोजणी करण्यात आली. १६ फेब्रुवारीला मोजणीनुसार हद्द निश्चित केल्यानंतर सोमवारी मंदिराच्या हद्दीतील अतिक्रमित मिळकतींची प्र्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, सहसचिव एस. एस. साळवी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मंदिराच्या एकूण मिळकतीपैकी पाच ते सहा हजार चौरस फूट हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. या जागा मंदिराला मिळाल्यास त्या मंदिर विकासासाठी फायदेशीर ठरणार आहेत.
हे अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमण मिळकतधारकांना नोटीस बजावून १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. मिळकतदारांनी अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले नाही अथवा जागेचा ताबा देण्यास विलंब झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही महेश जाधव यांनी सांगितले.
विकास आराखडा, पुनर्वसनाचा मुद्दा
मंदिराच्या घाटी दरवाजाच्या परिसरात फूलवाल्यांचे अतिक्रमण आहे. त्यांना येथून हटविल्यास त्यांचे पुनर्वसन कोठे करणार, हा प्रश्न आहे. अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला मंजुरी मिळून दीड वर्ष झाले तरी प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात झालेली नाही. त्यातच लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळेही अडचण झाली. आता सुरुवात झाली तरी दर्शनमंडप हाच वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
खासगी नव्हे, देवस्थानचीच मालकी
आजवर मंदिराच्या संरक्षण भिंतीच्या आतील ओवऱ्यांतील राममंदिर, गारेचा गणपती, दत्तमंदिर व अन्य मंदिरे जी आजवर खासगी मालकीची समजली जात होती, ती सर्व मंदिरे अंबाबाई मंदिराच्या हद्दीत येत असल्याचे नव्याने निदर्शनास आले आहे.
तसेच उद्यानाची जागा, बाह्य परिसरातील काशीविश्वेश्वर, कार्तिकेय मंदिर, तसेच मंदिराला लागून असलेला माउली लॉज, फूलविक्रेत्यांची दुकाने यांचा अतिक्रमित मिळकतीत समावेश आहे.