Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेत मद्यपान केल्यास कारवाई करणार, शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:45 IST2024-03-27T16:44:48+5:302024-03-27T16:45:39+5:30
जोतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासन आणि सासनकाठी धारक भाविकांची बैठक संपन्न

Kolhapur: जोतिबा चैत्र यात्रेत मद्यपान केल्यास कारवाई करणार, शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षकांचे आदेश
जोतिबा : चैत्र यात्रेत मद्यपान करून सहभागी होणाऱ्या भविकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी दिले. जोतिबा चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर जोतिबा डोंगर येथे सासनकाठीधारक भाविकांची शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक झाली.
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील श्री जोतिबाची चैत्र पौर्णिमेची यात्रा २३ एप्रिलला होत आहे. या पार्श्वभूमीवर आज जोतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सासनकाठीधारकांची नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मानाच्या सासनकाठ्या असणाऱ्या भाविकांना यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या. ज्यावेळी मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू असते त्यावेळी बिगर मानाच्या सासनकाठ्यांचा त्या मिरवणुकीत समावेश न करता त्यांना वेगळी वेळ द्यावी जेणेकरून मुख्य मिरवणुकीत गर्दी होणार नाही, अशी काही भाविकांकडून मागणी करण्यात आली. या सूचनेवर विचार करून निर्णय देण्याचे आश्वासन शिंगटे यांनी दिले.
मानाच्या सासनकाठ्याना ओळखपत्र देणे, सासनकाठीधारकांना पार्किंग व्यवस्था, सासनकाठीची उंची मर्यादित ठेवणे, सासनकाट्यांचा क्रम ठरवून देणे यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, पोलिस उपनिरीक्षक मनोज कदम, मंडल अधिकारी वासंती पाटील, तलाठी रमेश वळिवडेकर उपस्थित होते.