Kolhapur News: हद्दवाढीच्या आड येणाऱ्यांना कायमचे बाहेर हाकलू, कृती समितीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:54 IST2025-12-11T11:51:52+5:302025-12-11T11:54:39+5:30
पालकमंत्र्यांनी प्राधिकरणाचा मुद्दा काढून हद्दवाढीच्या विषयाला बगल दिली

Kolhapur News: हद्दवाढीच्या आड येणाऱ्यांना कायमचे बाहेर हाकलू, कृती समितीचा इशारा
कोल्हापूर : हद्दवाढीचा शब्द देणाऱ्या पालकमंत्र्यांनी आता ४२ गावच्या प्राधिकरणाला विशेष दर्जा देऊन हद्दवाढीला खो घातला आहे. पालकमंत्र्यांनी शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसली असली तरी आयआरबीसारख्या कंपन्यांना कोल्हापूरकरांनी हाकलून लावले आहे. त्यामुळे हद्दवाढीच्या आड येणाऱ्यांना कायमचे शहराबाहेर हाकलू, असा इशारा कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दिला. कृती समितीची बैठक समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या निवासस्थानी झाली. ॲड. बाबा इंदूलकर अध्यक्षस्थानी होते.
आर. के. पोवार म्हणाले की, पालकमंत्र्यांनी प्राधिकरणाचा मुद्दा काढून हद्दवाढीच्या विषयाला बगल दिली आहे. त्यांनी शब्द पाळला नसला तरी आम्ही हा लढा अधिक जोमाने लढणार आहोत.
बाबा इंदूलकर म्हणाले की, कोल्हापूर महापालिका निवडणुकीची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यामुळे हद्दवाढ आताही होऊ शकते. पण, पालकमंत्री प्रकाश आबिटकरच यात बाधा आणत आहेत. त्यांनी ती आणू नये. शहराचा श्वास गुदमरत असताना हद्दवाढीबाबत लोकप्रतिनिधी गप्प आहेत. मात्र, हा लढा अधिक तीव्र करणार असून, हद्दवाढीचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
दिलीप पोवार म्हणाले की, हद्दवाढीचा हा लढा सामूहिकपणे लढूया. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी कोपरा सभा घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करूया. यावेळी बाबा पार्टे, अनिल घाटगे, अशोक भंडारी, किशोर घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
आमदारांचे वजन कमी करण्यासाठीच पालकमंत्र्यांकडून बाधा
हद्दवाढीबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांना १० वेळा वेळ मागितली, कॉल केले; पण त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. हद्दवाढीबाबत शहरातील शिंदेसेनेचे आमदार आग्रही आहेत. शिंदेसेनेतील फॉर्मुल्यानुसार पुढच्या अडीच वर्षांत त्यांच्याकडे पालकमंत्रिपद जाऊ शकते. त्यामुळे त्यांना हद्दवाढीचे श्रेय जाऊ नये यामुळेच पालकमंत्री हद्दवाढीत बाधा आणत असल्याचा वास येत असल्याचा आरोप ॲड. इंदूलकर यांनी केला.