शिंगणापूरच्या घाटावर अंथरूण धुणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:21 IST2021-04-14T04:21:15+5:302021-04-14T04:21:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शिंगणापूर नदी घाटावर कपडे व अंथरूण धुण्यासाठी आलेल्या लोकांना पकडून पोलिसी खाक्या दाखवीत ग्रामपंचायतीने ...

शिंगणापूरच्या घाटावर अंथरूण धुणाऱ्यावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : शिंगणापूर नदी घाटावर कपडे व अंथरूण धुण्यासाठी आलेल्या लोकांना पकडून पोलिसी खाक्या दाखवीत ग्रामपंचायतीने पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून दंडात्मक कारवाई
केली. अशी कारवाई करणारी शिंगणापूर ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील बहुधा पहिलीच ग्रामपंचायत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या नद्यांमध्ये भोगावती पंचगंगा या दोन नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित आहेत. ग्रामीण भागातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे, कपडे व अंथरूण धुतले जातात, तर शेतकरी कीटकनाशक, तणनाशक मारून झाल्यानंतर पंप थेट नदीत स्वच्छ करतात, तसेच अनेक गावांचे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात मिसळत आहे. याशिवाय औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते. काही साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणी नदीत मिसळत असते, या सर्व गोष्टींमुळे नदी प्रदूषणात मोठी भर पडते.
शिंगणापूरचे सरपंच प्रकाश रोटे यांनी नदी घाटावर कपडे व अंथरूण धुण्यासाठी आलेल्या लोकांना पकडून पोलिसांकरवी दंडात्मक कारवाई केली. यावेळी घाटावर आलेल्या लोकांची पळताभुई थोडी झाली. कपडे व अंथरूण धुऊन नदी प्रदूषणात भर घालणाऱ्या लोकांवर कारवाई करणारी ही बहुधा जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असावी.
यावेळी करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कोळेकर, सुभाष कांबळे, सदस्य महेश पाटील व कर्मचाऱ्यांनी कारवाईत भाग घेतला. या लोकांकडून आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया
शिंगणापूर नदी घाटावर दररोज शेकडो लोक कपडे, अंथरूण धुण्याबरोबरच जनावरे धुतात. यातून नदीचे प्रदूषण होऊन हेच पाणी सर्व गावाला पिण्यासाठी वापरले जाते. हे थांबले पाहिजे, म्हणून धाडस करून कारवाई केली.
प्रकाश रोटे, सरपंच, शिंगणापूर.
फोटो
शिंगणापूर नदीघाटावर कपडे व अंथरुण धुणाऱ्यांवर कारवाई करताना सरपंच प्रकाश रोटे, सदस्य महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप कोळेकर व ग्रामपंचायत कर्मचारी.