वाचनाची चिकित्सा डोळस हवी
By Admin | Updated: December 5, 2014 23:19 IST2014-12-05T22:30:28+5:302014-12-05T23:19:28+5:30
शाम मानव : जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधी कणकवलीत मार्गदर्शन

वाचनाची चिकित्सा डोळस हवी
कणकवली : एखाद्या वचनाची चिकित्सा करता येत नाही, तेव्हा श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर होते. त्यासाठी डोळस श्रद्धा ठेवावी. आपल्या श्रद्धा वेळोवेळी तपासून पहाव्यात आणि त्यांची चिकित्सा करावी, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. शाम मानव यांनी व्यक्त केले. आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात वैद्यानिक दृष्टिकोन व जादूटोणा विरोधी कायद्यासंदर्भात काल (गुरुवार) रात्री आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अभय करगुटकर, निवासी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, समाजकल्याणचे सहआयुक्त जयंत चाचरकर, सुरेश झुरमुरे, तहसीलदार समीर घारे आदी उपस्थित होते.
शाम मानव म्हणाले की, अध्यात्मात खूप चांगल्या, हितकारक गोष्टी आहेत. त्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या आमच्या शिबिरातही शिकवतो. अध्यात्म मनाशी रिलेटेड आहे. विज्ञानाशी लढणारे अध्यात्म अस्तित्वात नाही. माणसाने विचार करण्याच्या शक्तीवर समृद्धी निर्माण केली. वैज्ञानिक प्रक्रियेतून गेल्या १०० वर्षांत जेवढी प्रगती झाली तेवढी मागील दहा लाख वर्षांत झाली नव्हती.
सुरेश झुरमुरे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन करा : दिलीप पांढरपट्टे
दिलीप पांढरपट्टे म्हणाले की, बहुतेक सगळे
बुवा थोतांड निर्माण करणारे असतात.
कोकणातील वातावरणच असे आहे की येथे अंधश्रद्धा जास्त निर्माण होतात. श्रद्धा आणि
अंधश्रद्धा यांची व्याख्या धूसर आहे.
अंधश्रद्धेविरोधात काम करताना लोकांना बरोबर घेऊन गेले पाहिजे. या कामाविरोधात लोक चिडून बोलतात हे चळवळीचे अपयश आहे. समोरच्याला शत्रू करण्याची भूमिका असू नये. लोकांच्या भावना न दुखावता प्रबोधन केले पाहिजे. एखाद्याला धार्मिक कृत्यातून समाधान मिळत असेल तर त्याच्या भानगडीत पडू नये. प्रत्येक वेळी समोरच्याला काही कळत नाही, असे समजू नये.
जादूटोणाबाबत प्रशिक्षण आवश्यक
बुवाबाजीमुळे होणाऱ्या लुबाडणुकीवर आळा घालण्यासाठी ड्रग अॅण्ड रेमेडीज अॅक्ट अपुरा पडू लागला. त्यासाठी प्रभावी कायद्याची गरज वाटू लागली. त्यातून झालेल्या चळवळीतून जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आला. हा कायदा एकमेवाद्वितीय असून व्यापक आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिसांचे प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांनाही तो समजला पाहिजे. हा कायदा देवाधर्माविरोधात नाही. तरीही कायद्यातील तरतुदींमुळे निर्दोष माणसे तुरूंगात जाऊ शकतात. यासाठी कलम ६ वेगळे ठेवावे लागले. कोणीही तक्रार करण्याच्या तक्रारीने या कायद्याचा गैरवापर होऊ शकतो, असा आमदारांचा आक्षेप होता. त्यासाठी दक्षता अधिकारी नेमण्यात आले आहेत, शाम मानव म्हणाले.