कोपार्डे : घाटगे-पाटील कंपनीतून कामावरून रविवारी सकाळी परत येत असताना कोल्हापूर ते गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर विठाई-चंद्राई हॉलच्या समोर सांगरुळ (ता. करवीर) प्रणव संजय देसाई (वय २१) याला कोकणातून येणाऱ्या टेम्पोने (एम एच १० डीटी ३६८५) समोरून जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.शनिवारी सायंकाळी घरातून जाताना ‘आई मी उद्या सकाळी लवकर येऊन शेतातील कामाचे बघतो,’ असे सांगून ‘प्रणव’ गेला; पण तो घरी परतलाच नाही. पाच महिन्यापूर्वी ‘प्रणव’च्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आता हाताशी आलेला मुलगा गेल्याने देसाई कुटुंबाच्या आक्रोशाने सारा गाव हळहळला.ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात वडील गेल्याने घरातील सगळी जबाबदारी अंगावर पडली. काही दिवस शेती व जनावरे सांभाळली; पण घरात दोन मोठ्या बहिणी यांचे लग्न हे सगळे प्रश्न ‘प्रणव’च्या समोर होते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी घाटगे-पाटील येथे कामावर गेला. रात्रपाळीत काम करायचे आणि दिवसभर शेती व जनावरे सांभाळण्यासाठी आईला मदत करत होता.
शनिवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे कामावर निघाला, ‘ आई मी उद्या सकाळी लवकर येतो मग शेतातील कामे करूया’ असे सांगून तो कामावर गेला आणि रविवारी सकाळी त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा निरोपच घरी आला.‘प्रणव’ कामावरून येताना गॅस सिलिंडर भरून गगनबावड्याकडून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा परिवार आहे.
आम्ही पोरके झालो..फेब्रुवारी महिन्यात ‘प्रणव’च्या वडिलांचा मृत्यू झाला. या संकटातून बाहेर पडून बहिणींच्या लग्नाची जबाबदारी पेलण्यासाठी ‘प्रणव’ची धडपड सुरू असतानाच त्याच्यावर काळाने झडप घातली. अवघ्या सहा महिन्यांत घरातील दोन कमवत्या व्यक्ती गेल्याने ‘प्रणव’च्या आई व बहिणींना ‘आम्ही पोरके झालो’ असा हंबरडा फोडला.वेळ सर्वांची येते अन् ‘प्रणव’ची ती आलीच‘प्रणव’ने रविवारी ‘संयम.. जीवनात सहनशक्ती ठेवा, वेळ सर्वांची येते..’ असा टेटस ठेवला होता. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर टेटसची चर्चा सुरू होती.