कोल्हापूर जिल्ह्यातील बँकेत तब्बल १३२ कोटींची रक्कम बेवारस पडून; डिसेंबरअखेर मिळवा असे पैसे, मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:10 IST2025-10-14T18:10:12+5:302025-10-14T18:10:23+5:30
'आपकी पूंजी, आपका अधिकार' मोहीम

कोल्हापूर जिल्ह्यातील बँकेत तब्बल १३२ कोटींची रक्कम बेवारस पडून; डिसेंबरअखेर मिळवा असे पैसे, मालमत्ता
कोल्हापूर : देशातील बँका आणि नियामक संस्थांकडे तब्बल १.८४ लाख कोटी रुपयांची आर्थिक मालमत्ता बेवारस अवस्थेत पडून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही तब्बल १३२ कोटी रुपये पडून आहेत. त्यासाठी सरकारने 'आपकी पूंजी, आपका अधिकार' या मोहिमेचा प्रारंभ केला आहे. आरबीआयने 'उद्गम' नावाचे पोर्टल तयार केले आहे. दावेदार किंवा वारसांनी कागदपत्रे सादर केल्यास या पैशांवर वैध दावा करता येतो.
'आपकी पूंजी, आपका अधिकार' मोहीम
अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग, आरबीआय, आयआरडीएआय, सेबी आणि आयईपीईए यांच्या समन्वयाने "आपकी पूंजी, आपका अधिकार" ही वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाद्वारे गमावलेले भांडवल लोकांना परत मिळवून देण्यासाठी एक जनजागृती मोहीम सुरु केली आहे. ती ४ ऑक्टोबरपासून डिसेंबर २०२५ अखेर चालेल.
बेवारस पैसे म्हणजे काय?
अनेकदा लोकांचे पैसे बँकेत, लाभांश, विमा पॉलिसीत, म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये तसेच पडून राहतात. त्यांना याची माहिती नसते किंवा त्यांचे जुने खाते तपशील बदललेले असतात, तसेच १० वर्षांपासून व्यवहार झालेले नाहीत, अशा मालमत्ता, ठेवींना बेवारस पैसे समजले जाते.
अनक्लेम्ड पैसे सरकारकडे सुरक्षित
दावा न केलेली बँकेतील जमा सर्व रक्कम आरबीआयकडे आणि शेअरसंदर्भातील मालमत्ता सेबी आणि आयईपीएफकडे सुरक्षित आहेत.
अशा पैशांवर दावा कसा करायचा?
आयईपीएफ पोर्टलवर निधी हस्तांतरणाची स्थिती तपासा. मोहिमेदरम्यान हेल्पलाइन नंबरवर कॉल करा किंवा तुमच्या जवळच्या बँक/पोस्ट ऑफिसमधील कॅम्पमध्ये सहभागी व्हा.
कोणकोणती कागदपत्रे आणि पुरावे लागणार?
यासाठी आधार, पॅन आणि पासबुक यासारखी मूलभूत कागदपत्रे आवश्यक असतील. सरकारच्या केंद्रीकृत वेबसाइटवरून याबाबतची एसओपी डाउनलोड करता येते.
असे पैसे का राहतात पडून..
नोकरीत असताना अनेक लोक अगदी पत्नीलाही न सांगता परस्पर बँकेत वेगवेगळ्या ठेवीमध्ये पैसे गुंतवतात. म्युच्युअल फंडात दरमहा पैसे भरतात. घरात सांगितले तर ते नको म्हणतील किंवा ही गुंतवणूक आपल्याकडून काढून घेतील अशी त्यांना भीती असते. अशा व्यक्तीचे निधन झाल्यास ही रक्कम तशीच पडून राहते. भुदरगड पतसंस्थेतही अशीच रक्कम मोठ्या प्रमाणात पडून आहे.
‘उद्गम’ पोर्टलवर रक्कम शोधण्याची सुविधा
हक्क न सांगितलेल्या ठेवींबद्दल सर्वप्रथम ‘उद्गम’ https://udgam.rbi.org.in/unclaimed-deposits/#/login या पोर्टलवर लॉग इन आणि नोंदणी करण्याचे पर्याय मिळतील. पहिल्यांदाच भेट देणाऱ्यांना नोंदणी करावी लागेल आणि नंतर लॉग इन करावे लागेल.
या मोहिमेमुळे लोकांना त्यांचे हक्काचे पैसे कसे शोधायचे आणि त्यावर दावा कसा करायचा, याची स्पष्ट माहिती मिळेल. त्यांना सक्षम बनवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेदरम्यान, नागरिकांना जागेवरच डिजिटल साधने वापरून आणि टप्प्याटप्प्याने प्रात्यक्षिके दाखवून त्यांना प्रक्रिया समजावली जाईल. -मंगेश पवार, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, कोल्हापूर.