कोल्हापुरात आढळला रक्तदाब पातळी नियंत्रित करणारा वृक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:18 IST2025-07-25T12:17:49+5:302025-07-25T12:18:38+5:30
डॉ. बाचूळकर यांची माहिती : ‘अमेरिकेन एल्डरबेरी’ची जिल्ह्यात प्रथमच नोंद :

कोल्हापुरात आढळला रक्तदाब पातळी नियंत्रित करणारा वृक्ष
कोल्हापूर : रक्तदाब पातळी नियंत्रित करणारा ‘अमेरिकेन एल्डरबेरी’ वृक्ष वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर आणि वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना शहरातील रुईकर कॉलनी परिसरात आढळला. हा वृक्ष, अनेक लहान, पांढऱ्याशुभ्र फुलांनी आणि गोल आकारांच्या लहान फळांनी लगडलेला होता.
रुईकर कॉलनी येथील साने गुरुजी सोसायटीच्या पाठीमागे असणाऱ्या गुरुनाथ रेसिडेन्सी येथे शिवम जाधव यांच्या घरातील बागेत हा वृक्ष आढळला. याचे निरीक्षण करताना तो व्हिबयुरनेसी कुळातील असल्याचे डॉ. बाचूळकर यांनी सांगितले. महाबळेश्वर येथूनही या वृक्षाची शास्त्रीय नोंद झालेली आहे. वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘सॅम्बुकस कॉनाडेण्सिस’ असून या वृक्षाला इंग्लिशमध्ये कॉमन एल्डरबेरी, अमेरिकेन एल्डरबेरी आणि अमेरिकेन ब्लॅक एल्डरबेरी अशी विविध नावे आहेत. हा मूळचा उत्तर अमेरिका खंडातील आहे.
बियांपासून तयार करु शकतात रोपे
हा लहान आकाराचा वृक्ष असून, चार मीटर उंची पर्यंत वाढतो. पाने संयुक्त प्रकाराची असून एक फूट लांब वाढतात. प्रत्येक पानावर पाच, सात किंवा नऊ पर्णिका असतात. फुले लहान, पांढरी शुभ्र असून ,फांद्यांच्या टोकांवर छत्राकारी,संयुक्त पुष्प मंजिरीत येतात. प्रत्येक फळामध्ये तीन ते पाच कठीण आवरणाच्या बिया असतात. फळे पिकल्यानंतर चकचकित निळसर काळ्या रंगाची असून, खाण्यायोग्य असतात. मुळांपासून तयार होणाऱ्या फुटव्यांपासून आणि बियांपासून रोपे तयार होतात.
हिमालय पर्वत प्रदेशांत एल्डरबेरी वृक्ष नैसर्गिकपणे आढळतात, केरळ,कर्नाटक, महाराष्ट्रात या वृक्षांची सुशोभित वृक्ष म्हणून बागांमध्ये लागवड करतात. या फळामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते. वैद्यकीय तज्ज्ञ सर्दी आणि ताप कमी करण्यासाठी तसेच रक्तदाब पातळी नियंत्रित होण्यासाठी या फळाची शिफारस करतात. - डॉ. मधुकर बाचूळकर, वनस्पतीशास्त्रज्ञ.