Kolhapur: ‘गडहिंग्लज’चा मास्टर प्लॅन बनवून कालबद्ध कार्यक्रम हवा, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:17 IST2024-12-24T18:17:28+5:302024-12-24T18:17:45+5:30
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, क्रीडा संकुल मार्गी लावावे

Kolhapur: ‘गडहिंग्लज’चा मास्टर प्लॅन बनवून कालबद्ध कार्यक्रम हवा, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अपेक्षा
राम मगदूम
गडहिंग्लज : विधानसभेच्या निवडणुकीत सहाव्यांदा निवडून आलेले जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे पुन्हा वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे गडहिंग्लजकरांच्या अपेक्षा खचितच वाढल्या आहेत. त्यांनी कागलच्या धर्तीवर गडहिंग्लजचा विकास करावा, अशा शहरवासीयांच्या अपेक्षा आहेत. आज (मंगळवार) ते गडहिंग्लज दौऱ्यावर येत आहेत. यानिमित्त शहरातील प्रलंबित मागण्या ठककपणे पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा केली जात आहे.
१५ वर्षांपूर्वी गडहिंग्लज शहराचा समावेश कागल मतदारसंघात झाला. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळाली. परंतु, ‘कागल’सारखा गडहिंग्लज शहराचा विकास झालेला नाही, अशी शहरवासीयांची भावना आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहराच्या सर्वांगीण विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा
सांगाव व उत्तूरप्रमाणे गडहिंग्लजमध्येही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून गडहिंग्लजसह आजरा व चंदगड तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाची सोय करावी.
गडहिंग्लज शहरातील प्रलंबित प्रश्न
- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी आजरा रोडवरील पशुचिकित्सालयाशेजारील जागा आरक्षित आहे. त्याठिकाणी ही इमारत बांधून प्रांतकार्यालयासह सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणावीत.
- प्रांत कचेरीची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करून नगरपालिका कार्यालयाची सध्याची इमारत आणि वाचनालयाची इमारत मिळून जळगाव महानगरपालिकेच्या धर्तीवर बहुमजली इमारत बांधून गडहिंग्लज पालिका आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवावी.
- प्रलंबित रिंगरोडचे काम मार्गी लावून वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा.
- वाढती लोकसंख्या विचारात घेऊन स्मशानभूमीचा विस्तार करून विद्युतदाहिनीची सुविधा उपलब्ध करावी. खुल्या जागा विकसित करून भाजीपाला-फळविक्री केंद्रे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, बगीचे इत्यादी सुविधा वाढवाव्यात. महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधावीत.
- गडहिंग्लज बाजार समिती आवारातील रस्त्यांची पुनर्बांधणी करून कृषीपूरक उद्योग-व्यवसाय बाजार समितीला ऊर्जितावस्था द्यावी.
- बेघरांसाठी शहरात घरकुल योजना राबवावी.
- नगरपालिकेच्या नियोजित नाट्यगृहाला भरीव निधी मिळवून द्यावा.