कोल्हापूर : वाशी येथील नवोदय अकॅडमीतून घरी जाण्यासाठी हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी मंगळवारी (दि. १८) शिक्षकावर गुन्हा दाखल केला. शिवाजी पांडुरंग भावके (वय ३०, रा. कुराडेवाडी, पोस्ट वाघवे, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. भावके यांनी सोमवारी (दि. १७) सकाळी प्रेम जाधव या विद्यार्थ्यास मारहाण केली होती. जखमी प्रेम याची आई संगीता सरदार जाधव (वय ३१, रा. कोपार्डे, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली.इयत्ता पाचवीत शिकणारा प्रेम जाधव हा गेल्याच आठवड्यात वाशी येथील नवोदय अकॅडमीत दाखल झाला होता. आईची आठवण होत असल्याने त्याने घराकडे जाण्याचा आग्रह धरला होता. मात्र शिक्षकांनी त्याला घरी जाऊ दिले नाही. सोमवारी सकाळी त्याने अकॅडमीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. अकॅडमीपासून जवळच असलेल्या एका घरात जाऊन त्याने तिथल्या महिलेच्या मोबाईलवरून आईशी संपर्क साधला. आई मुलाला भेटण्यासाठी वाशीकडे निघाली.दरम्यान, अकॅडमीतून पळालेला प्रेम जवळच एका घरात असल्याची माहिती शिक्षक भावके यांना मिळाली. त्यांनी मुलाला ताब्यात घेऊन मारहाण केली. यावेळी त्याच्या डोळ्याला इजा झाली. अकॅडमीत पोहोचलेल्या संगीता जाधव यांनी जखमी मुलास उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.जाधव यांनी सोमवारी मुलासह करवीर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
Kolhapur: घरी जाण्यासाठी हट्ट धरल्याने वाशीतील विद्यार्थ्यास मारहाण, शिक्षकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 16:34 IST