जुन्या कागदपत्रांद्वारे दुचाकींची पुन्हा परदेशात विक्री!, कोल्हापुरातील एका शोरूमचा प्रताप
By उद्धव गोडसे | Updated: December 12, 2024 13:30 IST2024-12-12T13:30:05+5:302024-12-12T13:30:37+5:30
आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता; गंभीर प्रकाराने खळबळ

संग्रहित छाया
उद्धव गोडसे
कोल्हापूर : कागदोपत्री जिल्ह्यात विकलेल्या दुचाकी मुंबईतील एका एजंटद्वारे परदेशात पाठविल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. कोल्हापुरातील ताराराणी चौकातील एका शोरूमने त्यांच्याकडील जुन्या ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून दुचाकींची विक्री केल्याने खळबळ उडाली आहे. कायदे धाब्यावर बसवून घडविलेल्या या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ठराविक भागात वाहनांची विक्री करण्याची परवानगी दिली जाते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून संबंधित वाहनांचे पासिंग झाल्यानंतरच ही वाहने रस्त्यांवर धावतात. कोणालाही परस्पर परदेशात वाहनांची विक्री करण्याची परवानगी नसते. मात्र, काही कंपन्यांकडून शासकीय यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करून बेकायदेशीरपणे वाहनांची परदेशात विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोल्हापुरातील ताराराणी चौक पुतळा परिसरातील शोरूमने त्यांच्याकडील जुन्या ग्राहकांची कागदपत्रे वापरून ३५ दुचाकींची विक्री केल्याचे दाखवले. प्रादेशिक परिवहन कार्यालयातून दुचाकींचे पासिंग करताना शोरूममधील ठरावीक मोबाइल नंबरचा वापर केला. त्यामुळे ज्याच्या नावे दुचाकीची खरेदी झाली त्यांना याची कल्पनाच आली नाही. मात्र, काही दिवसांतच कागदपत्रांवरील पत्त्यांवर स्मार्ट कार्ड पोहोचल्यानंतर खळबळ उडाली. आपण दुचाकी खरेदीच केली नाही, तरीही स्मार्ट घरी आल्याने नागरिक गोंधळले.
ग्राहकांच्या पत्त्यांवर स्मार्ट कार्ड गेल्याचे लक्षात येताच शोरूममधील अधिकाऱ्यांनी संबंधित पत्त्यांवर त्यांचे कर्मचारी पाठवून स्मार्ट कार्ड ताब्यात घेतली. नजरचुकीने स्मार्ट कार्ड तुमच्या पत्त्यावर गेल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तरीही पाच जणांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन तक्रार दिल्याने जिल्ह्यात विक्री झाल्याचे दाखवलेल्या दुचाकी प्रत्यक्षात जिल्ह्यात विकल्याच नसल्याचे समोर आले.
आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता
आपल्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे लक्षात येताच पाच जणांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन लेखी तक्रारी दिल्या. काही जणांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दिले. या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. यातून दुचाकींची बेकायदेशीरपणे परदेशात विक्री करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील कंपनीद्वारे दुचाकी परदेशात
जिल्ह्यातील नागरिकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून विकलेल्या दुचाकी पुढे मुंबईतील डॉल्फिन नावाच्या कंपनीला विकल्याची माहिती समोर आली आहे. त्या कंपनीने संबंधित दुचाकी परदेशात विकल्याचे सांगितले जात आहे. दुबईमार्गे पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि काही आफ्रिकन देशांमध्ये त्या पाठविल्याची माहिती समोर येत आहे.
ग्राहक धास्तावले
कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचे समजताच ग्राहक धास्तावले आहेत. विक्री झालेल्या दुचाकी जिल्ह्यातील नागरिकांच्या नावावर आहेत. संबंधित दुचाकींचा गैरवापर झाल्यास तपास यंत्रणा थेट कोल्हापूरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळेच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लाखोंच्या कमाईसाठी गोलमाल
या शोरूमने लाखो रुपयांची वरकमाई करण्यासाठी हा गोलमाल केल्याची चर्चा आहे. ग्राहकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करणे, मोटार वाहन कायद्यांचे उल्लंघन करणे, वाहननिर्मिती कंपनी आणि प्रादेशिक परिवहन कंपनीची फसवणूक केल्याचे गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकतात.