बाजारभोगाव : कोलिक (ता. पन्हाळा) येथील सोनाली नागेश कांबळे या गरोदर महिलेला पुराच्या पाण्यातून बोटीने सुखरूप दवाखान्यात पोहोचवण्यात आले. कळे पोलीस ठाणे व आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महिलेवर वेळेत उपचार होण्यास मदत झाली.ही गरोदर महिला किसरूळ येथे माहेरी होती. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने दवाखान्यात सुरक्षित पोहोचवणे गरजेचे होते. पोर्ले बंधाऱ्यानजीक पडसाळी रस्त्यावर कासारी नदीच्या पुराचे पाणी आले असल्याने सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे तिला दवाखान्यात कसे पोहोचवायचे? अशी चिंता कुटुंबीयांना सतावत होती. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवण्यात आली. अखेर कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी पुढाकार घेऊन बोटीच्या साहाय्याने साेनाली यांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.मंडलाधिकारी नलिनी मोहिते, ग्राम महसुल अधिकारी म्हसवेकर, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती चव्हाण, आरोग्य सहाय्यिका सारीका पाटील, आशा स्वयंसेविका सुवर्णा मुगडे, सिमा भवड, पोलीस पाटील विक्रम पाटील,सुभाष सावंत यांच्यासह आरोग्य कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी उपस्थित होते.
Kolhapur flood: गरोदर महिलेच्या मदतीला प्रशासन धावले, बोटीने सुखरूप दवाखान्यात पोहोचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:24 IST