कोल्हापुरात सावित्रीबाई फुले संस्थेला शासनाने दिलेल्या जागेवर लावला मराठा भवनचा फलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 11:41 IST2025-08-27T11:41:17+5:302025-08-27T11:41:50+5:30
मोठा पोलिस बंदोबस्त : पंढरपूरच्या मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आल्याने पोलिस नरमले

छाया - नसीर अत्तार
कोल्हापूर : हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले संस्थेला शासनाने दिलेल्या विश्वपंढरीसमोरील जमिनीवर सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी ‘मराठा स्वराज्य भवन नियोजित जागा’ अशा आशयाचा फलक लावण्यात आला. फलक लावू न देण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता; पण पंढरपूरहून मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ३० वाहनांतून दाखल होताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. शेवटी फलक लावण्यात आला.
सकल मराठा समाजाने भवनसाठी या जमिनीची मागणी केली होती; पण हीच जमीन शासनाने आमदार माने यांच्या संस्थेला दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या जमिनीवर नियोजित भवनचा फलक लावण्यासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते दुपारी बारा वाजता एकत्र आले. यावेळी एक मराठा, लाख मराठा, नियोजित मराठा भवनसाठीची जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आमदार माने यांना जमीन देणाऱ्या सरकारचा निषेध असो अशी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडले.
करवीर तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी आणि पोलिस फलक लावू नये, यासाठी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत होते; पण पदाधिकारी फलक लावण्यासाठी आक्रमक बनले होते. त्यावेळी बळाचा वापर करून फलक लावणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची जादा कुमक वाढवली. ताब्यात घेणाऱ्यांना स्थानबद्ध करण्यासाठी जाळीचे वाहन देखील तैनात केले.
पंढरपूरचे कार्यकर्ते आले अन् वातावरण बदलले
दरम्यान, मराठा योध्दा मनोज जरांगे - पाटील यांच्या मुंबई येथील आंदोलनाच्या जागृतीसाठी पंढरपूरहून निघालेले मराठा क्रांतीचे समन्वयक रामभाऊ गायकवाड हे ३० वाहनांच्या ताफ्यासह दाखल झाले. वाहनातून कार्यकर्तेे बाहेर पडताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेतली. वातावरण बदलले. मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेही बळ वाढले. परिणामी शांततेत जमिनीवर फलक लावण्यात आला. यावेळी मराठा भवनसाठी मागणी केलेली जमिनी आमदार माने यांच्या संस्थेच्या घशात घालू नये, अन्यथा राज्यभरातील मराठा बांधव आक्रमकपणे आंदोलन करतील, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी मुळीक म्हणाले, शहर, जिल्ह्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाने ११ वर्षांपूर्वी मराठा भवनासाठी मागितलेली ६ एकर १५ गुंठे जमीन शासनाने आमदार अशोक माने यांना देणे चुकीचे आहे. शासनाने हा निर्णय रद्द करावा. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शशिकांत पाटील, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.