कोलकात्याहून रुग्ण घेऊन विमान आले, प्रकृती बिघडताच कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:18 IST2025-09-12T12:17:56+5:302025-09-12T12:18:10+5:30
मेडिकल इमर्जन्सीवेळी काय दिली जाते सुविधा

कोलकात्याहून रुग्ण घेऊन विमान आले, प्रकृती बिघडताच कोल्हापुरात इमर्जन्सी लँडिंग
कोल्हापूर : कोलकात्याहून एका रुग्णाला कोल्हापुरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन येणाऱ्या विमानाचे कोल्हापूरविमानतळावर गुरुवारी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हे विमान गुरुवारी नियोजित वेळेनुसार कोल्हापुरात येणार होते. मात्र, रुग्णाची परिस्थिती पाहून संबंधित विमान कंपनीने मेडिकल इमर्जन्सी घोषित करून आधीच उतरण्यासाठी प्रायोरिटी लँडिंगची मागणी केली होती.
कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणने ती तत्काळ मान्य केल्याने विमानाला नियोजित वेळेआधीच लँडिंग करता आले. यामुळे कोल्हापूर विमानतळ मेडिकल इमर्जन्सीसाठीही देशभर अधोरेखित झाले आहे.
कोलकात्याहून हे विमान कोल्हापूरसाठी निघाले असता रायपूर विमानतळावर ते इंधन भरण्यासाठी थांबले. चार वाजून एक मिनिटाने तेथून त्या विमानाने कोल्हापूरसाठी उड्डाण केले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी मेडिकल इमर्जन्सी घोषित करून उतरण्यासाठी प्रायोरिटी लँडिंगची मागणी केली. ती तत्काळ मान्य केल्याने हे विमान सहा वाजून सहा मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर उतरले. त्यानंतर संबंधित रुग्णाला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मेडिकल इमर्जन्सीवेळी काय दिली जाते सुविधा
विमानातील प्रवाशांना आकस्मिक आघात किंवा प्रकृती स्वास्थ्याच्या कारणावरून मेडिकल इमर्जन्सी घोषित केली जाते. अशा परिस्थितीत इतर विमानांपेक्षा उतरण्यासाठी प्राथमिकता दिली जाते. शिवाय वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाते.