Kolhapur: महाविद्यालयीन तरुणाला जोगता सोडण्याचा कार्यक्रम हाणून पाडला, गडहिंग्लज तालुक्यातील अजब प्रकार उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:18 IST2025-01-31T12:18:09+5:302025-01-31T12:18:33+5:30
अंनिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले समुपदेशन

संग्रहित छाया
नेसरी : गडहिंग्लज तालुक्यातील एका ऐतिहासिक गावातील तरुणाचा मानदुखीचा त्रास कमी होईना म्हणून काही लोकांच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेमुळे जोगता म्हणून सोडण्याचा कार्यक्रम अंनिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. हा प्रकार जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उघडकीस आला. विशेष म्हणजे संबंधित तरुण त्याच गावातील एका वरिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात शिकत आहे.
अधिक माहिती अशी, पीडित तरुणाचे आई-वडील मोलमजुरी करतात. त्याचा मोठा भाऊ मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. गेली एक-दोन वर्षे पीडित तरुणाला मानदुखीचा त्रास सुरू आहे. जुजबी उपचार केल्याने तो कमी झाला नव्हता. त्याला आजारपणातून मुक्तता मिळावी म्हणून या संबंधित कुटुंबाने त्याला काही देवाचे तर झाले नाही ना ? यासाठी चुकीच्या मार्गाने प्रयत्न केले असता काही देवर्ष्यांनी त्या तरुणाला यल्लमा देवीला जोगता म्हणून सोडण्याचा अजब सल्ला दिला. त्यानुसार त्या तरुणाला देवीला जोगता सोडण्याच्या विधिवत कार्यक्रमाची तयारी या कुटुंबाने सुरू केली.
या प्रकाराची कुणकुण समाजातील काही जाणकार तरुणांना समजली. त्यांनी गडहिंग्लज अंनिस व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना कळविले. कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला याची माहिती देताच पोलिसांनी तत्काळ या कुटुंबाला पोलिस स्टेशनमध्ये आणले.
वरिष्ठ अधिकारी, पोलिस व कार्यकर्त्यांनी त्या कुटुंबाशी चर्चा करून असा प्रकार करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगून त्याच्यावर चांगले वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला देत त्यांचे समुपदेशन करून असा काही कार्यक्रम करणार नसल्याचे लिहून घेतले. संबंधित मुलाच्या वडिलांनीही हा प्रकार गैरसमज व अंधश्रद्धेतून झाल्याचे सांगितल्याने यावर पडदा पडला.
देवदासी, जोगता प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केला आहे. बेकायदेशीररीत्या मुला-मुलींना हिंदू मंदिरांमध्ये समर्पित करण्यास बंदी असतानाही केवळ अंधश्रद्धेतून असे प्रकार घडतात. विज्ञान युगात काहींच्या चुकीच्या सांगण्यावरून असे हिडीस प्रकार घडतात ही आश्चर्यांची बाब आहे.- प्रकाश भोईटे, राज्य कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र अंनिस
आजारपणाच्या मुक्ततेसाठी पीडित तरुणाला देवीच्या सेवेसाठी, जोगता म्हणून सोडायला पाहिजे अशी भीती भोंदूनी घातल्यानेच हे कुटुंब या थराला आले. मात्र, त्याचवेळीच समुपदेशन झाल्याने त्या तरुणाची मुक्तता झाली. जाणकार तरुणांचे अभिनंदन. - प्रा. सुभाष कोरे.