Kolhapur: दीड वर्षाच्या बालकासह विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या

By उद्धव गोडसे | Updated: March 13, 2023 23:16 IST2023-03-13T23:15:31+5:302023-03-13T23:16:25+5:30

कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

A married woman with a child committed suicide in Rankala in Kolhapur | Kolhapur: दीड वर्षाच्या बालकासह विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या

Kolhapur: दीड वर्षाच्या बालकासह विवाहितेची रंकाळ्यात आत्महत्या

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: कौटुंबिक वादातून विवाहितेने तिच्या दीड वर्षाच्या बालकासह रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. रुकसार अनिस निशाणदार (वय २६) आणि उमर अनिस निशाणदार (वय दीड वर्षे दोघेही मूळ रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, सध्या रा. रंकाळा टॉवर परिसर, कोल्हापूर) असे मृतांचे नाव आहे. सोमवारी (१३) दुपारी ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री साडेआठच्या सुमारास दोघांचे मृतदेह रंकाळ्यातून बाहेर काढले. पती अनिस अन्वर निशाणदार आणि सासू सायराबानू अन्वर निशाणदार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका मृत विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी घेतली. तर सासरचे काही नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यासाठी सीपीआरमध्ये आल्याने दोन्ही गटात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

CPR मधून मिळालेल्या माहितीनुसार, फुलेवाडी येथील निगडे गल्लीतील रुकसार हिचा २२ नोव्हेंबर २०२१ मध्ये पट्टणकोडोली येथील अनिस निशाणदार याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने अनिस याने एमआयडीसीत एका कंपनीत काम केले. त्यानंतर नोकरी सोडून तो सतत पत्नीशी वाद घालत होता. अनेकदा मद्यप्राशन करून तो पत्नीला मारहाण करीत होता. तसेच सासू सायराबानू हीदेखील सुनेला शारीरिक, मानसिक त्रास देत होती. त्रासाला कंटाळून ती दोन महिन्यांपासून पती आणि दीड वर्षाच्या मुलासोबत रंकाळा टॉवर परिसरातील भाड्याच्या घरात राहत होती. दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीचा जोरदार वाद झाला. त्यानंतर पती अनिस घरातून निघून गेला होता.

रविवारी रुकसार आपल्या मुलासह माहेरी फुलेवाडी येथे आईकडे गेली होती. संध्याकाळी ती रंकाळा टॉवर येथील घरी परतली. सोमवारी दुपारपासून तिचा मोबाइल लागत नसल्याने माहेरच्या नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली. यावेळी रंकाळ्यावरील महादेव मंदिराजवळ तिचे चप्पल आढळले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास रंकाळ्यात आधी बालकाचा मृतदेह सापडला, तर काही मिनिटांनी रुकसार हिचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title: A married woman with a child committed suicide in Rankala in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.