Kolhapur: धामणीत सापडला बिबटयाचा बछडा, बघ्यांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:34 IST2025-03-06T15:32:41+5:302025-03-06T15:34:20+5:30
ड्रोनने घेतला मादी बिबट्याचा शोध

Kolhapur: धामणीत सापडला बिबटयाचा बछडा, बघ्यांची मोठी गर्दी
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड: धामणी धरण परिसरातील जंगल हद्दीतील पडसाळी येथील पडसाळी न्यू वसाहत येथे बिबटयाचा बछडा सापडला. गावातील काही तरुणांनी याबाबत राधानगरी वन विभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत बछड्याला ताब्यात घेवून नैसर्गिक अधिवासात सोडले.
आज, गुरुवार दुपारच्या सुमारास पडसाळी मधील न्यू पडसाळी वसाहती मध्ये घराचे बांधकाम सुरू असताना स्थानिकांना घराच्या भिंतीला हे बिबट्याचा बछडा दिसला. ही बातमी गावात कळताच गावकऱ्यांनी बिबट्याचा बछडा बघायला मोठी गर्दी केली. काही तरुणांनी याबाबत राधानगरी वनविभागाला माहिती दिली.
ड्रोनने घेतला मादी बिबट्याचा शोध
वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बछड्याला ताब्यात घेतले. ड्रोनने मादी बिबट्याचा शोध घेऊन तिच्या पासून अवघ्या १५० मिटर अंतरावर या बछड्याला सोडले. त्यानंतर मादी बिबड्या पाच ते सहा मिनिटात बछड्याला पकडून जंगलात निघून गेली. यावेळी राधानगरी व कोल्हापूरच्या रेस्क्यू टिमचे कर्मचाऱ्यासह प्रदिप सुतार, वनरक्षक अशोक संकपाळ, वनसेवक धोंडीरात सुतार यांच्यासह स्थानिकांनी सहकार्य केले.