Kolhapur: जोतिबाच्या पहिला खेट्याला भाविकांची मोठी गर्दी, चांगभलंचा अखंड गजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:34 IST2025-02-17T18:34:12+5:302025-02-17T18:34:29+5:30
जोतिबा : वाडी रत्नागिरी येथे चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाच्या खेट्याला सुरुवात झाली. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र , ...

Kolhapur: जोतिबाच्या पहिला खेट्याला भाविकांची मोठी गर्दी, चांगभलंचा अखंड गजर
जोतिबा : वाडी रत्नागिरी येथे चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत जोतिबाच्या खेट्याला सुरुवात झाली. कोल्हापूर शहराबरोबरच आता महाराष्ट्र , कर्नाटक राज्यातील भाविकही श्रद्धेने खेट्यात सहभागी होतात. रविवारी पहिल्या खेट्याला जोतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती.
कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गाय मुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत आले होते, जोतिबाचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. चांगभलंचा गजर डोंगरावर घुमत होता. रविवारी मध्यरात्रीपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी पहाटे ४ वाजता मंदिराचे दरवाजे उघडले, सकाळी ८ ते ९ अभिषेक, सकाळी ११ वाजता धुपारती, दुपारी ३ ते ४ अभिषेक, रात्री पालखी सोहळा झाला. स्थानिक पुजारी, ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीकडून डोंगरावर येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती.
दरम्यान, रविवारी पहिल्या खेट्यादिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री जोतिबाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा गुरव समाज आणि देवस्थान समितीच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्याबरोबर पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे जाधव, आनंदा लादे, नवनाथ लादे, धैर्यशील तिवले, हेमंत भोरे, आदी उपस्थित होते.
खेट्याची आख्यायिका
कोल्हापूर ते जोतिबा डोंगर असे पायी प्रवासाने रविवारी जोतिबाचे दर्शन घेतले जाते. कोल्हापूरच्या अंबाबाईने पायी अनवाणी चालत येऊन जोतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत भाविक जोतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात.