Kolhapur: कापडात बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद-कुंकू; बैल व मालकांच्या नावे स्मशानभूमीत अघोरी पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 15:53 IST2025-12-15T15:53:24+5:302025-12-15T15:53:44+5:30
घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण

Kolhapur: कापडात बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद-कुंकू; बैल व मालकांच्या नावे स्मशानभूमीत अघोरी पूजा
नाना जाधव
भादोले: येथील स्मशानभूमीत भानामतीचा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम असल्याने ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्मशानभूमीतील एका ठिकाणी लोटक्याला लाल रंगाच्या दोराने कापडात घट्ट बांधण्यात आले होते.संशय आल्याने काही विकास अवघडे, आकाश अवघडे, उदय अवघडे, संजय अवघडे (कोतवाल) यांच्यासह ग्रामस्थांनी ते कापड उघडून पाहिले असता त्यामध्ये बाहुली, अस्थी, लिंबू, टाचण्या, हळद-कुंकू, गुलाल, काळे उडीद यासारखे साहित्य आढळून आले. याशिवाय एका चिठ्ठीमध्ये परिसरातील ‘टॉप’ बैलांची नावे तसेच त्यांच्या मालकांची नावे स्पष्टपणे लिहिलेली असल्याचे दिसून आले. हा अघोरी प्रकार बैल शर्यतीतील वर्चस्व मिळवण्यासाठी अथवा प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय आहे.
वाचा- पुरोगामित्वावर घाला; कोल्हापूर जिल्ह्यात अघोरी पुजा, काळी जादू, भोंदूगिरीचे पेव
घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. चिठ्ठीतील नावे उघड झाल्याने संबंधित बैलमालकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही नागरिकांनी अशा अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.