Kolhapur: अभ्यास पूर्ण होत नसल्याने नैराश्य, दहावीच्या विद्यार्थ्याने वाढदिनादिवशीच संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:14 IST2024-02-16T14:14:08+5:302024-02-16T14:14:25+5:30
इचलकरंजी : तोरणानगर-शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६) ...

Kolhapur: अभ्यास पूर्ण होत नसल्याने नैराश्य, दहावीच्या विद्यार्थ्याने वाढदिनादिवशीच संपवले जीवन
इचलकरंजी : तोरणानगर-शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६) असे त्याचे नाव आहे. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शाळेतील अभ्यास पूर्ण होत नसल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तेजस हा शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. गुरुवारी तेजस याने राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास येताच त्याच्या नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी म्हणून आयजीएम रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आईवडील व बहीण असा परिवार आहे.
वाढदिनादिवशीच आत्महत्या
आजच त्याचा वाढदिवस होता. वाढदिना दिवशीच मुलाने जीवन यात्रा संपविल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.