चार टक्के निधीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ, कोल्हापूर जिल्हा नियोजनच्या बैठकीत ९४० कोटींच्या आराखड्याला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 11:56 IST2025-02-03T11:55:33+5:302025-02-03T11:56:24+5:30
गांजा, हद्दपार गुंडप्रश्नी आमदारांकडून पोलिस प्रशासन धारेवर

चार टक्के निधीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ, कोल्हापूर जिल्हा नियोजनच्या बैठकीत ९४० कोटींच्या आराखड्याला मंजुरी
कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीकडे २०२४-२५ सालासाठी प्राप्त २६८ कोटी निधीपैकी ९६ टक्के निधी खर्च झाला आहे. यामुळे नवे पालकमंत्री झाल्यानंतरच्या दोन तासांच्या बैठकीतील गुऱ्हाळात शिल्लक चार टक्के निधी खर्चावर चर्चा झाली. सन २०२५ -२६ या वर्षासाठी ९४० कोटींचा आराखडा करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाला. यावेळी जिल्ह्यातील गांजा विक्री, हद्दपार गुंडप्रश्नी आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, राहुल आवाडे यांनी पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते. सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, गेल्या वर्षाचा मिळालेल्या निधीपैकी ९६ टक्के निधी खर्च झाला आहे. आता चार टक्के निधी शिल्लक आहे. शासनाच्या नियोजन विभागाकडून यंदा ५१८ कोटी ५६ लाखांचा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. पण, यामध्ये ४२१ कोटी ४७ लाखांच्या अतिरिक्त निधीची मागणी करून एकूण ९४० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देऊ. पुढील प्रक्रियेसाठी विभागीयस्तरावरील ७ फेब्रुवारीच्या बैठकीत पाठपुरावा करू. अधिकाऱ्यांनी विकासकामे करताना आमदार, खासदारांना विश्वासात घ्यावे. लोकप्रतिनिधींचा अवमान होईल असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही.
सहपालकमंत्री मिसाळ म्हणाल्या, नगरविकास विभाग असल्याने शहरातील विकासाचे प्रस्ताव तयार करून माझ्याकडे पाठवावे. करवीर निवासिनी अंबाबाईचा विकास दक्षिण काशीच्या धर्तीवर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला लागावे.
आमदार यड्रावकर, आवाडे यांनी इचलकरंजीसह जिल्ह्यात गांजाची आवक वाढली आहे. त्याची विक्रीही खुलेआम सुरू आहे. गांजाच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. इचलकरंजीतील उद्योजकांना एका गोव्यातील महिलेने गंडा घातला आहे. प्रकरण मिटवण्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार झालेले गुंड सक्रिय झाले आहेत. कोल्हापुरातून हद्दपार झालेले गुंड महाराष्ट्र सीमेलगतच्या बेळगाव जिल्ह्यातील गावांत राहतात. यावर जिल्हा पोलिस प्रमुख पंडित म्हणाले, न्यायालयीन तारखेसाठी हद्दपार गुंड येतात. इतर वेळी ते येत नाहीत. सीमेलगतच्या गावात ते राहत असतील तर कर्नाटक पोलिसांना कळवू.
बैठकीस खासदार शाहू छत्रपती, धैर्यशील माने, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अशोकराव माने, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, जयंत आसगावकर, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पन्नास टक्के विषय आण्णांचेच
समितीच्या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक वेळा मिश्कील टोलेबाजी केल्याने हशा पिकत होता. विषय पत्रिकेवर आमदार राहुल आवाडे बोलत असताना, यातील निम्मे विषय हे एकट्या आण्णांचेच (प्रकाश आवाडे) यांचे असल्याचे टोला हाणला.
जिल्हा क्रीडा अधिकऱ्यांना झापले..
आमदारांनी सुचवलेल्या कामांना केराची टोपली दाखवतात, ते सन्मानजनक वागणूकही देत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर, अशी कार्य पद्धती चालणार नाही, अशा शब्दात पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा आडसूळ यांना झापले.
वीज, महाऊर्जेच्या अधिकाऱ्यांना सुनावले
वीज कनेक्शन, सौर ऊर्जेेच्या अनेक तक्रारींकडे सर्वच आमदारांनी लक्ष वेधले. यावरून वीज, महाऊर्जेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री आबिटकर यांनी चांगलेच सुनावत कामकाजात सुधारणा करण्याचे आदेश दिले.
बगलबच्चे बैठकीत, पत्रकार बाहेर..
बैठकीत आमदारांचे खासगी बगलबच्चे खुलेआम बसले होते. याउलट पत्रकारांना बैठकीत बसण्यास मज्जाव केला. पत्रकारांपासून बैठकीतील वृत्तांत लपवण्यामागचा हेतू काय ? असा प्रश्न उपस्थित झाला. बैठकीत प्लास्टिकच्या बाटल्या टाळून स्टिलच्या बाटल्या ठेवल्या होत्या. नाष्ट्याचे वितरणही कार्पाेरेट पद्धतीने करण्यात आले.