कोल्हापूर जिल्ह्यात ८७ गावांमध्ये अंत्यसंस्काराला स्मशानभूमीच नाही, पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सर्वाधिक गावे
By समीर देशपांडे | Updated: July 22, 2025 17:16 IST2025-07-22T17:16:17+5:302025-07-22T17:16:32+5:30
जागा मिळेना, प्रश्न सुटेना, शेवटच्या प्रवासाची चिंता मिटेना

संग्रहित छाया
समीर देशपांडे
कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्याची अखेर ठरलेली आहे; परंतु हा शेवटचा प्रवासही सुखाचा व्हावा, अशी इच्छा सर्वांचीच असते; परंतु जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ८७ गावे आणि वाड्यांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नाही. त्यामुळे या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा मिळेना, प्रश्न सुटेना आणि शेवटच्या प्रवासाची चिंता मिटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
प्रत्येक गावाला, वाडीला, वस्तीला स्मशानभूमी गरजेची असते; परंतु अनेक ठिकाणी जागांची अडचण असल्याने स्मशानभूमीच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वैयक्तिक शेतामध्ये बहुतांशीवेळा अंत्यसंस्कार करण्यात येतात; परंतु अशावेळी अनेक मर्यादा येतात. भावकीमध्ये जर मतभेद नसतील तर प्रश्न निर्माण होत नाहीत; परंतु अनेकदा गावपातळीवर ज्यांची गुंठाभरही जमीन नाही अशांची कुचंबना होते. गेली अनेक वर्षे या गावांमध्ये स्मशानभूमी नाही, ही वस्तुस्थिती आहे; परंतु याबाबत काही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ प्रशासकीय पातळीवर हा प्रश्न सुटणारा नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहे.
मंत्री, आमदार आणि खासदार यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. कारण अनेकदा जागा मिळवताना स्थानिक पातळीवर अडचणी येतात. अशा प्रकरणांमध्ये त्या-त्या परिसराच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले तर हे प्रश्न सुटू शकतात. अनेक तालुक्यांतील मोठ्या गावांमध्येही स्मशानभूमी नसल्याचे दिसून येते. वास्तविक स्मशानभूमी आणि तिकडे जाणारे रस्ते यासाठी निधीची उपलब्धता सहज होत असताना इतक्या वाड्या- वस्त्यांवर आणि गावांमध्ये स्मशानभूमी नसणे भूषणावह नाही.
स्मशानभूमी नसलेली तालुकावार गावे
- राधानगरी - २१
- आजरा - १६
- भुदरगड - १३
- शाहूवाडी - १२
- करवीर - १०
- चंदगड - ०९
- शिरोळ - ०५
- हातकणंगले - ०१
- एकूण - ८७
खास योजना तयार करण्याची गरज
या सर्व गावांमध्ये जर स्मशानभूमी करायची असेल तर त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून योजना तयार करण्याची गरज आहे. त्यातून जागा घेण्यासाठी अनुदान देऊन त्या ठिकाणी लवकरात लवकर स्मशानभूमी कशी करता येईल, याकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी खास लक्ष देऊन तशी योजना जाहीर करण्याची मागणी होत आहे. त्यांच्याच मतदारसंघात स्मशानभूमी नसलेली गावे अधिक आहेत.