Kolhapur: साके येथील दूध संस्थेत ८३ लाखांचा अपहार; सचिव व संचालकांसह अठरा जणांवर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 12:31 PM2024-04-05T12:31:44+5:302024-04-05T12:33:13+5:30

कागल : साके (ता. कागल ) येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेत ८३ लाख ३ हजार ९४७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ...

83 lakh embezzlement at milk institute in Sake kagal takula kolhapur district; Crime against eighteen persons including secretary and director | Kolhapur: साके येथील दूध संस्थेत ८३ लाखांचा अपहार; सचिव व संचालकांसह अठरा जणांवर गुन्हा 

Kolhapur: साके येथील दूध संस्थेत ८३ लाखांचा अपहार; सचिव व संचालकांसह अठरा जणांवर गुन्हा 

कागल : साके (ता. कागल) येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेत ८३ लाख ३ हजार ९४७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिव व संचालक मिळून अठरा जणांवर कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अठरा जणांमध्ये चार सचिव तर चौदा संचालक आरोपी असून, सहा संचालकांवर मृत्यू पश्चात गुन्हा दाखल झाला आहे. लेखापरीक्षक श्रेणी एक सहकारी संस्था कोल्हापूर राजेश जयसिंग हंकारे यांनी याबद्दलची तक्रार कागल पोलिसांत दिली आहे. तेरा वर्षे कालावधीत हा अपहार झाला आहे.

संस्थेचे तत्कालीन सचिव शामराव पाटील, बाजीराव चौगुले, नानासाहेब कांबळे, विद्यमान संचालक तानाजी चौगुले, ज्ञानदेव पाटील, बाळासाहेब पाटील, रघुनाथ पाटील, सुशीला पाटील, आंबुबाई घराळ, सुनीता पाटील, नमिता कांबळे, आनंदा पाटील, मोहन गिरी (सर्व रा. साके, ता. कागल), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

तर तत्कालीन संचालक असणाऱ्या तुकाराम चौगुले, चंद्रकांत निऊंगरे, पांडुरंग पाटील, बाळासाहेब पाटील, गणपती चौगुले, गोविंद चौगुले यांचे निधन झाले आहे. ४ जानेवारी २००९ ते २१ मार्च २०२२ या कालावधीत हा अपहार झाला असून, आरोपींनी संगनमते संस्थेच्या रकमेचा अपहार केला आहे. त्यामध्ये पशुखाद्य बिले, दूध बिले, दूध फरक, कामगार खर्च, निवडणूक खर्च, मेहनताना खर्च, हात उचल, रेतन लस खरेदी आदी प्रकारच्या रकमा टाकून हा अपहार केला असून, यामध्ये सभासदांना उधारीवर पशुखाद्य पुरवठा रक्कम २८ लाख ८२ हजार ९८७ अशी आहे. तर अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा संस्थेने ठेवलेल्या नऊ लाख रुपये रकमेचीही विल्हेवाट लावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत.

साके गावातील मोठी दूध संस्था

साके गावात सर्वात जास्त दूध संकलन करणारी ही दूध संस्था सध्याही सुरू आहे. गावच्या मुख्य चौकात संस्थेची दुमजली इमारत आहे. एकाच राजकीय गटातील दोन अंतर्गत गटांच्या वादातूून तक्रारी होऊन हा अपहाराचा विषय चव्हाट्यावर आला. सध्या या एका इमारतीत दोन ठिकाणी वेगवेगळे दूध संकलन केले जात आहे.

संचालक सचिव गावातील कार्यकर्ते..

 २००९ ते २०२२ या काळात म्हणजे तेरा वर्षे हा अपहार चालू होता. पण कोणतीच कारवाई होत नव्हती. सचिव व संचालक बदलत गेले; पण संस्थेमधील पैसे वेगवेगळ्या कारणांनी काढून घेणे थांबले नाही. सामान्य दूध उत्पादकांना याबद्दल फारसे घेणे-देणेही नव्हते. या संस्थेचे संचालक व सचिव गावातील प्रमुख कार्यकर्ते आहेत. यातील एक आरोपी नानासाहेब कांबळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि बाजार समितीचे विद्यमान सदस्य आहेत.

Web Title: 83 lakh embezzlement at milk institute in Sake kagal takula kolhapur district; Crime against eighteen persons including secretary and director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.