पाच हजार शेतकऱ्यांची ७० कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 04:56 IST2019-12-17T04:55:54+5:302019-12-17T04:56:49+5:30
महारयतने घातला गंडा : दोन आरोपी कोल्हापुरातून ताब्यात

पाच हजार शेतकऱ्यांची ७० कोटींची फसवणूक
अमरावती : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात महारयत अॅग्रो इंडिया कंपनीने राज्यभरातील पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे. अमरावती येथील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रोड्यूस वाँरन्टवर सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा.इस्लामपूर, जि. सांगली) या दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना अमरावती येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महारयतचा संचालक सुधीर माहिते याने सहकारी संदीप मोहिते याच्या मदतीने राज्यभरातील अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात स्टॉल लावले होते. त्यांच्या कंपनीत ५२५ कर्मचारी कार्यरत होते. १०० कडकनाथ कोंबड्यांमागे तब्बल ३ लाख १५ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची हमी त्यांनी शेतकºयांना दिली. मात्र, कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुविधा अथवा कोंबड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत.
आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नाहीत
राज्यभरातील शेतकºयांना गंडा घालणारे आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नावाने प्रसिद्धीस आले असले तरी ते एकमेकांचे भाऊ नाहीत. मोहितेवाडीत राहणारे असल्यामुळे या दोघांना ‘मोहिते बंधू’ म्हणून ओळखले जात आहे. ते केवळ कोंबडीपालन व्यवसायात खाद्य पुरवठादार आहेत.
कोट्यवधींची संपत्ती जप्त
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस हवालदार राजेश शेंडे, शैलेश रोंघे, दीपक धोटे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची इस्लामपुरातील उंडी उबवण केंद्रातील मशीनरी, तीन महागडी वाहने जप्त केली. आणखी मालमत्ता उघड करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे.