खुशखबर!, अंगणवाडी सेविकांना ७ दिवस दिवाळी सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:52 IST2024-10-25T18:51:28+5:302024-10-25T18:52:18+5:30
शासनाचे परिपत्रक मागे : मानधनासोबत कामाचे तासही वाढले

खुशखबर!, अंगणवाडी सेविकांना ७ दिवस दिवाळी सुट्टी
कोल्हापूर : अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३०० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन टप्प्यांत दिलेल्या सुट्टीला विरोध झाल्यानंतर बुधवारी हा निर्णय शासनाने मागे घेतला. आता अंगणवाडी सेविकांना व मदतनिसांना २७ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंत सात दिवस सलग दिवाळीची सुट्टी असणार आहे. शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करत त्यांच्या कामाची वेळ दोन तासांनी वाढवली आहे.
अंगणवाडीतील बालकांना वर्षातील ३० दिवस पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने अंगणवाडी सेविकांना ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर तर मदतनीस यांना ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी मंजूर केल्याचा आदेश मंगळवारी काढला. मात्र, याला अंगणवाडी सेविका व मदतनिसांकडून तीव्र विरोध झाला. तसे पत्र संघटनेने एकात्मिक बालविकास सेवायोजनेचे आयुक्त कैलास पगार यांना पाठवले. त्यानंतर बुधवारी शासनाने हा आदेश मागे घेतला.
वेळ पाचपर्यंत वाढवली..
शासनाने या महिन्यापासून अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन वाढवले आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजारांवरून १३ व सेवाज्येष्ठता वाढ, मदतनिसांचे मानधन ५ हजारांवरून ७५०० व सेवाज्येष्ठता वाढ असे करण्यात आले आहे. मात्र, त्याचबरोबरीने त्यांच्या वेळेत २ तासांनी वाढ केली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी त्यांची वेळ असेल. त्यातील दोन तास हे गृहभेटीचे असणार आहेत.
सुट्टीत मुले शाळेत कशी येतील?
दिवाळीच्या सुट्टीत लहान मुले शाळेत येत नाहीत. शाळेचा पोषण आहार खातील की घरचे सणासुदीचे जेवण, फराळ खातील? शिवाय ते पालकांसोबत आजोळी, परगावी जातात. त्यामुळे या कालावधीत अंगणवाडी सुरू ठेवण्यात काही अर्थ नव्हता. ही बाब संघटनेने निदर्शनास आणून दिल्यानंतर शासनाने निर्णय मागे घेतला.