कोल्हापूर : गर्भवती महिला आणि मातांचे मृत्यू रोखण्यासाठी शासकीय स्तरावरून विविध प्रयत्न सुरू असतानाही माता मृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आलेले नाही. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ६४ मातांचे मृत्यू झाले. रविवारी (दि. ३१) सकाळी मनीषा अजित सासणे (वय २५, रा. मंगरायाची वाडी, पेठ वडगाव, ता. हातकणंगले) या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा माता मृत्यूची समस्या चर्चेत आली आहे.मंगरायाची वाडी येथील मनीषा सासणे या त्यांच्या माहेरी गडहिंग्लज येथे गेल्या होत्या. सातव्या महिन्यात झालेल्या प्रसूतीनंतर प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी त्यांना गडहिंग्लज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मनीषा यांच्या मृत्यूमुळे अवघे दोन दिवसांचे बाळ आईच्या मायेला पोरके झाले. या घटनेने जिल्ह्यातील माता मृत्यूची समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात तब्बल ६४ मातांचे मृत्यू झाले. गर्भवती, माता आणि नवजात अर्भकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. तरीही माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ६४ मातांचे मृत्यू, आरोग्य व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:04 IST