कोल्हापूर जिल्ह्यातील अणदूर धरणालगत ४५ फार्महाऊस, सांडपाणी थेट जलाशयात

By उद्धव गोडसे | Updated: May 6, 2025 13:26 IST2025-05-06T13:25:44+5:302025-05-06T13:26:13+5:30

बेकायदेशीर बांधकामांनी पाणलोट क्षेत्राची रचना बदलली

45 farmhouses near Andur Dam in Kolhapur district, sewage directly into the reservoir | कोल्हापूर जिल्ह्यातील अणदूर धरणालगत ४५ फार्महाऊस, सांडपाणी थेट जलाशयात

कोल्हापूर जिल्ह्यातील अणदूर धरणालगत ४५ फार्महाऊस, सांडपाणी थेट जलाशयात

उद्धव गोडसे

कोल्हापूर : निसर्गरम्य आणि अल्हाददायक हवेचे ठिकाण असलेल्या गगनबावडा तालुक्यातील अणदूर धरणालगत ४५ फार्महाऊस आणि रिसॉर्ट आहेत. यातील १६ फार्महाऊसचे सांडपाणी थेट जलाशयात जाते. पाणलोट क्षेत्रात बांधकाम करण्याची परवानगीच नसताना या परिसरात राजरोस बांधकामे झाली आहेत.

खासदारांपासून ते पंचायत समितीचे सदस्य, काही उद्योजक, व्यावसायिक, शिक्षकांचेही फार्महाऊस दिमाखात उभे आहेत. नियम धाब्यावर बसवून झालेली बांधकामे अणदूर धरणाच्या अस्तित्वालाच नख लावणारी ठरत असल्याचे ‘लोकमत’च्या ‘ग्राऊंड रिपोर्ट’मध्ये पाहायला मिळाले.

गगनबावडा तालुक्यातील अणदूर लघु प्रकल्पाची क्षमता ५.७५ दशलक्ष घनमीटर आहे. यातील पाण्याचा वापर लाभक्षेत्रातील सुमारे ४५० हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी होतो. हिरवाईने नटलेल्या डोंगरांच्या कुशीतील हा जलाशय म्हणजे निसर्गाची देणगीच आहे. पण, याच निसर्ग वैभवावर धनदांडग्यांना घाला घातला आहे. ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणांशी हातमिळवणी करून पैसेवाल्या लोकांनी या परिसरात फार्महाऊस आणि रिसॉर्ट थाटली आहेत.

धरणालगतची जागा पाटबंधारे विभागाने संपादित केली असताना, या ठिकाणी खासगी मालकीचा हक्क सांगितला जातो. पाटबंधारे विभागाच्या परवानगीशिवाय धरणालगतच्या जागांची विक्री झाली कशी?, कुणाच्या परवानगीने त्यावर बांधकामे झाली? बेकायदेशीर बांधकामांना कोणी आश्रय दिला?, याचे गौडबंगाल उलगडण्याची गरज आहे.

धनदांडग्यांचे फार्महाऊस

अणदूर ते धुंदवडे मार्गावर धरणालगतची दीड ते दोन किलोमीटर परिसरातील सर्वच जागा बाहेरच्या लोकांनी विकत घेतल्याची माहिती स्थानिकांनी दिली. यात एका खासदारासह जिल्ह्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, डॉक्टर, शिक्षकाचा समावेश आहे. लाखो रुपये खर्च करून त्यांनी फार्महाऊस रिसॉर्ट तयार केली आहेत.

पाणलोट क्षेत्राची रचना धोक्यात

फार्महाऊस बांधण्यासाठी डोंगर पोखरले जात आहेत. प्रचंड वृक्षतोड सुरू आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत हिरवागर्द दिसणारा डोंगर ठिकठिकाणी आता बोडका दिसत आहे. बांधकामे अशीच सुरू राहिल्यास पाणलोट क्षेत्राची नैसर्गिक स्थिती बदलण्याचा धोका आहे.

ना शोषखड्डे, ना कचऱ्याचा उठाव

धरणालगत असलेल्या सर्वच फार्महाऊसचे सांडपाणी थेट जलाशयात जाते. शोषखड्डे केवळ दाखवण्यापुरतेच आहेत. ग्रामपंचायतीकडून कचऱ्याचा उठाव होत नाही, त्यामुळे परिसरात दारू आणि शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचा खच पडला आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाकडून फार्महाऊस धारकांना केवळ नोटिसा पाठवण्याचे काम झाले आहे.

सरपंचांनी फोन उचलला नाही

अणदूरच्या सरपंच सरिता पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. त्यांचे पती पांडुरंग पाटील यांना फोन केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातून माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.

आम्ही हे पाहिले..

  • एकाही फार्महाऊसला पाटबंधारे विभागाची परवानगी नाही.
  • एकाही बांधकामावर कारवाई नाही.
  • धरण परिसरात सुरक्षा, सूचना फलक नाहीत.
  • विनापरवानगी बांधकामे सुरूच.
  • पाणलोट क्षेत्रात डोंगर खोदण्याचे काम सुरू.

Web Title: 45 farmhouses near Andur Dam in Kolhapur district, sewage directly into the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.