कोल्हापुरातील कळंबा कारागृह झाले ओव्हरफ्लो !, क्षमतेपेक्षा ४०६ कैदी जास्त
By उद्धव गोडसे | Updated: October 29, 2025 17:40 IST2025-10-29T17:39:18+5:302025-10-29T17:40:21+5:30
कर्मचाऱ्यांवर ताण, नियंत्रणासाठी कसरत

कोल्हापुरातील कळंबा कारागृह झाले ओव्हरफ्लो !, क्षमतेपेक्षा ४०६ कैदी जास्त
उद्धव गोडसे
कोल्हापूर : राज्यातील प्रमुख कारागृहांपैकी एक असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची संख्या खूपच वाढली आहे. १६९९ कैद्यांची क्षमता असताना तब्बल २१२७ कैदी शिक्षा भोगत आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या कमी असताना कैद्यांची संख्या वाढत असल्याने नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
कारागृहात कुख्यात गुन्हेगार
मुंबई बॉम्बस्फोटासह इतर दहशतवादी कारवाया, अमली पदार्थ तस्करी, खून, गुंडांच्या टोळ्यांमधील अनेक कुख्यात गुन्हेगार कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यातील काही परदेशी गुन्हेगारांचाही यात समावेश आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कळंबा कारागृह संवेदनशील मानले जाते.
क्षमता केवळ १६९९ कैद्यांची
कळंबा कारागृहात १६९९ कैद्यांची क्षमता आहे. यात १६६२ पुरुष आणि ३४ महिलांची व्यवस्था आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे कैद्यांची संख्या वाढत आहे. सध्या या कारागृहात २०४६ पुरुष आणि ८१ महिला कैदी शिक्षा भोगत आहेत.
क्षमतेपेक्षा जादा कैदी
कळंबा कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा ४०६ कैदी जास्त आहेत. महिला कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा दुपटीहून जास्त आहे. याचा परिणाम सुविधा आणि सुरक्षेवर होऊ शकतो.
अपुरे मनुष्यबळ
कैद्यांच्या तुलनेत कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ २०४ मनुष्यबळ मंजूर आहे. यातील १८० मनुष्यबळ उपलब्ध असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो.
तरुण कैद्यांची संख्या सर्वाधिक
कारागृहात १९ ते ४० वयोगटातील कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. चोरी, मारामारी, फसवणूक यासह कौटुंबिक वादातून झालेल्या गुन्ह्यांत यांचा समावेश होता. गुन्हेगारी टोळ्यांचेही प्रमाण वाढत असल्याने कारागृहातील तरुण कैद्यांची संख्या वाढत असल्याचे अधिकारी सांगतात.
कैद्यांमध्ये ३० टक्के पदवीधर
पूर्वी कैद्यांमध्ये अल्पशिक्षितांची संख्या जास्त असे. अलीकडे पदवीधर कैद्यांची संख्या वाढत आहे. वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी जगताचे आकर्षण, व्यसनाधिनता, अमली पदार्थांची तस्करी अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कळंबा कारागृहात सुमारे ३० टक्के कैदी पदवीधर असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली.