राज्यात २०२९ ला विधानसभेचे ४०० आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:47 IST2025-01-28T11:46:48+5:302025-01-28T11:47:25+5:30
१३३ महिलांना संधी मिळणार

राज्यात २०२९ ला विधानसभेचे ४०० आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच
कोल्हापूर : महाराष्ट्रात २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ४०० मतदारसंघ असतील. शिवाय विधानसभेत महिला आमदारांचाही टक्का वाढणार आहे असून, विधानसभेत १३३ महिला आमदार दिसतील, असे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजपतर्फे रविवारी येथे ‘संविधान गौरव अभियान’ आयोजित केले होते. त्या वेळी त्यांनी ही शक्यता वर्तवली. यावेळी राज्यघटनेच्या अनुषंगाने बोलताना पाटील यांनी कॉंग्रेसवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्तित्व ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणांना भाजपने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. त्यांचे लंडनमधील घर विकत घेऊन त्याचे स्मारक केले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने घटना बदलावरून नागरिकांची दिशाभूल केली. मात्र काँग्रेसचा हा फसवा प्रचार विधानसभेच्या निवडणुकीत उघडा पडला. काँग्रेसने घटनेत दुरुस्ती करताना सर्वाधिकार केंद्राकडे घेतले होते. तर पंतप्रधान मोदी यांना आर्थिकदृष्टया मागास घटकांना दहा टक्के आरक्षणासाठी घटना दुरुस्ती केली.
या वेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमित गोरखे, आमदार राहुल आवाडे, महेश जाधव, राहुल चिकोडे, डॉ. संजय एस. पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, रूपाराणी निकम, विजय भोजे उपस्थित होते.