२८ वर्षांची ४३ फुटी उंच कमान दीड तासांतच जमीनदोस्त; कोल्हापूरच्या ‘स्वागत’ कमानीला अखेरचा ‘निरोप’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:45 IST2025-11-07T11:44:59+5:302025-11-07T11:45:30+5:30
दोन पोकलॅंडची कमाल, दीड तासात जमीनदोस्त कमान

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : गेली २८ वर्षे शहरात येणाऱ्या सर्वांचे स्वागत करणारी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेलजवळील ४३ फुटी स्वागतकमान अखेर गुरुवारी रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी जमीनदोस्त करण्यात आली. फक्त दीड तासांत दोन पोकलँडच्या सहाय्याने ही कमान पाडताना ठेकेदारासह महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. एकीकडे वाहतूक बंद ठेवत, पोलिस बंदोबस्तात ही कमान पाडताना बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.
ही कमान पाडण्याचा निर्णय झाल्यानंतर गुरुवारी दिवसभर महापालिकेच्या यंत्रणेने यासाठीची जय्यत तयारी केली होती. त्यानुसार रात्री १० वाजून २० मिनिटांनी या ठिकाणी महापालिकेच्या बूमच्या सहाय्याने सुरुवातीला शाहू महाराज आणि अंबाबाईचे छायाचित्र असलेले दोन्ही बाजूचे स्वागतफलक पूर्ण दक्षता घेऊन काढण्यात आले. त्यानंतर महापालिकेचा लोगोही काढण्यात आला.
११ वाजता प्रत्यक्षात पाडकामाला सुरुवात झाली. त्यानंतर मात्र दोन्ही पोकलँडनी शहर आणि महामार्गाच्या बाजूने पहिल्यांदा पिलरच्या मधील भाग पाडून टाकला. त्यानंतर फक्त पिलर शिल्लक राहिले. नेमक्या पिलरना धक्का देत असताना १२ वाजता शहराकडूनचा डावा भाग वरून कोसळला. त्यानंतर पाचच मिनिटांत संपूर्ण कमान जागेवरच पाडण्यात कामगारांना यश आले.
वाचा- १५ बुरुज, एका बुरुजाचे वजन साधारण ३०० किलो, चार मार्ग; कोल्हापूरची ओळख बनलेली स्वागतकमान इतिहासजमा
शहर सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून खासगीकरणातून नोव्हेंबर १९९७ मध्ये उभारलेल्या या कमानीची देखभाल-दुरुस्ती खासगी ठेकेदार करत होते; परंतु पाच वर्षांपूर्वी नागरिकांच्या तक्रारीवरून महापालिकेने ती स्वत:च्या ताब्यात घेतली. त्यानंतर मात्र कमानीच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. एक दीड महिन्यांपूर्वी या कमानीच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्यानंतर महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी कमानीची पाहणी केली. त्यावेळी कमानीला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे, गिलाव्याचा भाग कोसळत असल्याचे, तसेच आतील सळ्या दिसत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या कमानीचे महापालिका पॅनेलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रशांत हडकर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले. कमान धोकादायक असल्याचा अहवाल मिळताच तातडीने ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी दिवसभर महापालिकेच्या इस्टेट, अग्निशमन, विद्युत, बांधकाम आदी विभागांचे अधिकारी, महावितरण, पोलिस अधिकारी यांच्या समन्वयातून, तसेच ठेकेदाराच्या माध्यमातून एका रात्रीत कमान पाडण्याचे नियोजन करण्यात आले. तावडे हॉटेल परिसरातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यासह तेथे पर्यायी जनरेटरची सोय करण्यात आली. रात्री साडेदहा वाजल्यापासून प्रत्यक्ष कमान पाडण्याच्या कामाला सुरुवात झाली. बघ्यांची गर्दी हटवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसही रस्त्यावर उतरले होते.
वाहतूक वळवली..
कमान पडत असतानाच्या कालावधीमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीने तावडे हॉटेलमार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक उचगावमार्गे वळविण्यात आली होती, तर शहरातून तावडे हॉटेलमार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शियेमार्गे वळवण्यात आली होती. कमानीकडे जाणारे रस्ते बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आले होते.
अशी राबली यंत्रणा
दोन पोकलॅंड, ३ जेसीबी,१८ टिपर, बूम १, ३५ कामगार, फ्लड लाईट असलेली एक जीप, जनरेटर, गॅस कटर इतकी यंत्रणा यासाठी वापरण्यात आली. गेली २० वर्षे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ठेकेदार उमेश पोवार यांनी महापालिकेसह कामगारांच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे दोन तासांत कमान जमीनदोस्त करण्यात आली. पहाटेपर्यंत सर्व मलबा हटवून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. या ठिकाणी एक रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आली होती.
भगवा झेंडा काढण्यासाठी काम थांबविले
पाडकाम सुरू झाल्यानंतर कमानीवर उंचावर असलेला भगवा झेंडा व्यवस्थित काढण्याचे आव्हान होते. मात्र, पाडकाम थांबवून दुसऱ्या बाजूला असलेला महापालिकेचा बूम पुन्हा दुसऱ्या बाजूला आणण्यात आला आणि महापालिकेचेच कर्मचारी बूममधून वर गेले आणि अतिशय उंचावर असलेला भगवा झेंडा काढून सोबत घेऊन खाली आले.
अधिकारी तळ ठोकून
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १० च्या आधीच या ठिकाणी हजर होते. त्यांच्याबरोबर शहर अभियंता रमेश मस्कर, सहा. आयुक्त कृष्णा पाटील, जलअभियंता हर्षनील घाटगे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, उपायुक्त परिताेष कंकाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, उपशहर अभियंता निवास पोवार हे सर्वजण या ठिकाणी तळ ठोकून होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही संपूर्ण योगदान दिले.
चित्रीकरणासाठी गर्दी
गेली २८ वर्षे सेवा देणाऱ्या ही कमान पाडणार असल्याचे दुपारीच सोशल मीडियावरून अनेकांना समजले होते. त्यामुळे रात्री दहापासूनच या ठिकाणी बघ्यांची तसेच मोबाईलवर चित्रीकरण करण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती.