चिंताजनक!, कोल्हापूर जिल्ह्यात दहा गरोदर मातांसह २६७ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 11:52 IST2025-11-01T11:51:51+5:302025-11-01T11:52:30+5:30
जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीतील माहिती

संग्रहित छाया
कोल्हापूर : जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत उद्दिष्टापेक्षा जास्त ६९,४७० एचआयव्ही टेस्ट झाल्या. त्यापैकी २६७ जण पॉझिटिव्ह आहेत. याची टक्केवारी ०.४ इतकी आहे. यातील ३४३५६ गरोदर मातांची तपासणी केली, त्यापैकी १० महिला पॉझिटिव्ह आढळून आल्या.
आईपासून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग वेळेत घेतलेल्या औषधोपचारांमुळे ३८ बालकांपैकी एकाही बाळाला एचआयव्ही संसर्ग झाला नाही, अशी माहिती जिल्हा एड्स प्रतिबंध समितीच्या बैठकीत शुक्रवारी देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, सेक्स वर्कर, स्थलांतरित कामगार या जोखीम गटातील व्यक्तींसह गरोदर महिला, क्षयरोगी यांच्या प्राधान्याने १०० टक्के एचआयव्ही तपासण्या कराव्यात. आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून एचआयव्ही तपासणी किटकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक, एआरटी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लिंक्ड एआरटी सेंटर समुपदेशक, जिल्हा समुदाय संसाधन समिती सदस्य तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जागतिक युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन केंद्रांमार्फत सुरू असलेल्या इंटेन्सिफाइड आयईसी कॅम्पेनअंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायतींमध्ये संवेदीकरण चालू असून, या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशंसा केली.